पक्षांची चिंता तर दिग्गजांची वाढली धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:58+5:302021-08-26T04:30:58+5:30
चंद्रपूर : आगामी काळात महानगर पालिकांच्या निवडणुकांचे संकेत आहे. चंद्रपूर महानगर पालिकेचीही निवडणूक होईल. २०१७ च्या निवडणुकीत एका प्रभागातून ...
चंद्रपूर : आगामी काळात महानगर पालिकांच्या निवडणुकांचे संकेत आहे. चंद्रपूर महानगर पालिकेचीही निवडणूक होईल. २०१७ च्या निवडणुकीत एका प्रभागातून चार सदस्य निवडून दिले होते. मात्र आगामी निवडणूक वाॅर्डनिहाय होणार आहे. एका वाॅर्डातून एकच सदस्य निवडून द्यायचा आहे. यामुळे सत्तेचे समीकरण बदलणार आहे. परिणामी राजकीय पक्षांची चिंता आणि दिग्गजांची धाकधूक वाढली आहे. ही बाब मागील काही दिवसांपासून मनपामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या हालचालींवरून दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत १७ प्रभागातून ६६ सदस्य निवडून महानगर पालिकेत गेले होते. १७ पैकी १५ प्रभागातून प्रत्येकी ४ या प्रमाणे ६० सदस्य निवडले गेले होते. तर उर्वरित दोन प्रभागातून प्रत्येकी तीन सदस्य निवडले होते. आगामी निवडणुकीत ६६ वॉर्डातून ६६ उमेदवार निवडले जाणार आहे. प्रभागनिहाय निवडणुकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडून येण्याची संधी अधिक होती. एखादा उमेदवार कमकुवत असला तरी तो इतर उमेदवारांच्या मदतीने निवडून येण्याची शक्यता अधिक होती. अपक्षांना विस्ताराने मोठ्या असलेल्या प्रभागात प्रचार करताना दमछाक होत होती. खर्चही झेपत नव्हता. आगामी निवडणूक वाॅर्डनिहाय होणार असल्याने अनेकांना आतापासूनच नगरसेवक पदाचे स्वप्न पडू लागले आहेत. राजकीय पक्षांची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे. वाॅर्डनिहाय निवडणुकीत पक्षीय उमेदवारांपेक्षा ज्या उमेदवाराचे त्या वाॅर्डात चांगले प्राबल्य आहे वा तो असलेला समाज मोठा आहे, अशा उमेदवारांना निवडून येण्याची संधी अधिक असणार आहे. यामुळे प्रभागाच्या निवडणुकीत जिंकणाऱ्या दिग्गज उमेदवारांनाही ही निवडणूक वाटते तितकी सोपी असणार नाही. महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळातील फाॅर्म्यूला बदलून नगर परिषद, नगर पंचायत व महानगर पालिकेच्या निवडणुका वाॅर्डनिहाय घेण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या राजकीय पक्षांची चिंताही वाढली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मनपात भाजप हाच मोठा पक्ष आहे. आता या निवडणुकीत भाजपलाही आपली रणनीती बदलावी लागणार असे यावरून दिसून येते.