कोरोनातून सावरत असतानाच ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटने वाढविली चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:20 AM2021-06-25T04:20:49+5:302021-06-25T04:20:49+5:30
जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा कहर सुरू होता. मृतांची संख्याही धडकी भरविणारी होती. आता कोरोना संसर्ग उतरणीवर लागला ...
जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा कहर सुरू होता. मृतांची संख्याही धडकी भरविणारी होती. आता कोरोना संसर्ग उतरणीवर लागला असताना डेल्टा प्लस व्हेरियंटची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात बुधवारपर्यंत ५ लाख ४२ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी ४ लाख ५५ हजार २२८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही ८२ हजार ४७४ पर्यंत पोहोचली आहे. बुधवारपर्यंत ५९६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे १५२२ बाधितांचे मृत्यू झाले. मात्र, बाधित आणि मृतांची संख्या दररोज कमी होताना दिसत आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर घसरल्याने निर्बंध शिथिल होऊन सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, राज्यात कोविड १९ चा नवीन ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट आढळला. परिणामी आरोग्य यंत्रणा सावध झाली असून संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी उपाययोजना आणि ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, या दोन्ही पातळ्यांवर प्रशासन कामाला लागले आहे.
काय आहे ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट ?
महाराष्ट्रातील केवळ सहा जिल्ह्यांतच डेल्टा प्लस व्हेरियंट आढळल्याची माहिती राज्य शासनाने जाहीर केली. चंद्रपूर जिल्ह्यात या आजाराचा एकही रुग्ण नाही. ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट तपासण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यभरातून ७ हजार ५०० नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यात जिल्ह्यातील नमुन्यांचाही समावेश होता. कोविड १९ व्हायरसची संख्या वाढताना त्याच्या मूळ रूपात बदल होतो. त्यामुळे विषाणूला नवीन रूप प्राप्त होते. त्याला ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंट म्हटले जाते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात काय खबरदारी ?
मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जागृती सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली.
लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर केले जात आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून आरोग्य सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोना चाचणीसाठी सर्वच केंद्र सुरू आहेत. खासगी कोविड हॉस्पिटलही सुरू ठेवल्या आहेत.