समारोपीय समारंभात गुंजले ‘स्वर गुरुकुंजाचे’
By admin | Published: March 1, 2017 12:47 AM2017-03-01T00:47:53+5:302017-03-01T00:47:53+5:30
गुरूकुंज आश्रमातील मानव सेवा छात्रालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ‘स्वर गुरुकुंजाचे’ पाहून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर प्रभावित झाले.
राष्ट्रसंत साहित्य संमेलन : केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
चंद्रपूर : गुरूकुंज आश्रमातील मानव सेवा छात्रालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ‘स्वर गुरुकुंजाचे’ पाहून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर प्रभावित झाले. मुक्तकंठाने या बाल कलाकारांचे कौतुक केले. महाराष्ट्र शासन आणि अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रमद्वारा कन्यका सभागृहात राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन झाले. समारोप ना. हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपाध्यक्ष पुष्पा बोंडे, माजी आमदार वामनराव चटप, सरचिटणीस जनार्दन बोथे, संमेलन समन्वयक डॉ. रघुनाथ वाडेकर, अॅड. दत्ता हजारे, लक्ष्मणराव गमे, पाटील गुरुजी, लक्ष्मण काळे महाराज, बबनराव वानखेडे, उषाताई हजारे, शोभाताई पोटदुखे, बंडोपंत बोढेकर, ज्ञानेश्वर मुळे, मनोहर पाऊणकर, रूपलाल कावळे आदी उपस्थित होते.
गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस बोथे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात संयोजक अमोल बांबल यांनी घेतलेल्या परिश्रमातून या बाल कलाकारांनी गुरुकुंज मोझरी ते दिल्ली असा यशस्वी दौरा करीत राज्य तसेच राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त केलेले आहे. राष्ट्रसंताच्या परिवर्तनवादी व राष्ट्रीय भजनाचा प्रचार प्रसार ही मंडळी शिक्षणासोबत करीत आहे. सर्व जातीधर्माचे विद्यार्थी गुरुकुंजात शिक्षण घेत आहेत.
समारोपीय कार्यक्रमात आश्रमाच्या वतीने पुष्पा बोंडे यांनी शासनाकडे काही मागण्या केल्यात तेव्हा ना. अहीर यांनी त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. डॉ.वाडेकर यांनी संमेलनाच्या अभूतपूर्व यशाबद्दल समाधान व्यक्त केले. अॅड. हजारे यांनी आभार मानले. राष्ट्रवंदनेने समारोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)