गोंडसभेच्या अधिवेशनाचा समारोप
By admin | Published: December 27, 2014 10:48 PM2014-12-27T22:48:10+5:302014-12-27T22:48:10+5:30
येथे आयोजित गोंडवाना महासभेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची शनिवारी पारंपरिक रेला नृत्याने सांगता झाली. यात एकूण १३ ठराव मांडून ते पारित करण्यात आले.
बल्लारपूर : येथे आयोजित गोंडवाना महासभेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची शनिवारी पारंपरिक रेला नृत्याने सांगता झाली. यात एकूण १३ ठराव मांडून ते पारित करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिशुपाल शौरी हे होते. मंचावर खासदार नागेश घोडाम, आ. नामदेव उसेंडी, डॉ.के. एम. मैत्री, अंजू सिडाम, देवकुमार नैताम, सोनूब नैताम, आर.एम. धुरिया, महेंद्र नायक, शेरसिह आखेला, दुर्गावती उईके, डॉ. श्रीकांत गोंड, प्रमोदसिंह पोरते, वनमाली प्रसाद, नारायण मरकान, मुर्लीधर टेकाम, विष्णू नैताम यांची उपस्थिती होती.
पाहुण्यांनी आपल्या भाषणातून गोंड समाजाच्या ज्या समस्या आणि मागण्या आहेत, त्या प्रभावीपणे मांडल्या. नक्षली हल्ल्यात गोंड आदिवासी समाज बांधवाचे नाहक जीव जात आहे. याबाबत शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टिका करीत नक्षली हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या मुलांच्या पालन पोषणाची तसेच शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, याकरिता समाज संघटना मदत करू शकते. तदवतच, गोंडी भाषेचे व संस्कृतीचे जतन करण्याकरिता शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे देशभरात गोंडकालीन किल्ले वा गड आहेत, त्याचे जतन शासनाने योग्य प्रकारे करावे. गोंडी समाज बांधवांनी एकोपा ठेवून आपले हक्क शासनाकडून घ्यावे, असे विचार मांडत समाज बांधवांना मार्गदर्शन केले. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अधिवेशनात १३ ठराव मांडण्यात आले. त्यात गोंडी भाषा व संस्कृतीला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, विविध क्षेत्रात वेगवेगळ्या नावाने राहणाऱ्या गोंड समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा, चंद्रपूरला होत असलेल्या मेडिकल कॉलेजला राणी हिराईचे व चंद्रपूर विमानतळाला वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव द्यावे या विषयांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)