चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरची पाण्याची टाकी केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:59 AM2017-11-06T11:59:56+5:302017-11-06T12:02:51+5:30
५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : ५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला. सुदैवाने त्यावेळी पाण्याच्या टाकीखाली कुणीही नसल्याने जिवित हानी टळली. टाकीच्या पायऱ्या सुद्धा जीर्ण झाल्या असून टाकी कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी या पाण्याच्या टाकीला रंगरंगोटी करण्यात आली. रंगरंगोटी करण्यापूर्वी टाकीची डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र डागडुजी न करता रंगरंगोटी केली. रंगरंगोटी करताना परिसरातील व्यापाऱ्यांना संबंधित पेंटरला हटकले. मात्र न.प.च्या आदेशानुसार त्याने रंगरंगोटी केली. आता रंगरंगोटी केलेला भाग कोसळल्याने डागडुजी करून परत रंगरंगोटी करावी लागणार आहे.
जुन्या वस्तीत असलेल्या पाणी टाकीजवळ व्यवसायिक दुकाने असून रहिवासी सुद्धा आहेत. ५० वर्र्षापूर्वी बांधलेली टाकी जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते. तेव्हा नगर परिषदेने त्वरित बाजुलाच नवीन पाणी टाकी बांधावी व संभाव्या होणारी जीवित हानी टाळावी, अशी मागणी शेख अजीज, शेखर बांगडे, नारायण मोहुर्ले, मंगरूळकर यांनी केली आहे.
नवीन टाकी बांधण्याचा ठराव सात-आठ महिन्यापूर्वी घेण्यात आला आहे. परंतु त्याची मंजुरी घेण्यास यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे नवीन टाकीचे काम झाले नाही. आपण याबाबत पाठपुरावा करीत असून ठरावाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नवीन टाकीचे काम एक-दोन महिन्याच्या आत सुरू होईल.
- विजयालक्ष्मी डोहे
नगराध्यक्ष, नगर परिषद गडचांदूर.