उपोषणकर्ते नारायण जांभुळेंची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:26 PM2019-03-02T22:26:43+5:302019-03-02T22:26:56+5:30
माना समाजाच्या आदेशाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी व परिसरातील विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली. मात्र पाचव्या दिवशी उपोषणकर्ते नारायण जांभुळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : माना समाजाच्या आदेशाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी व परिसरातील विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली. मात्र पाचव्या दिवशी उपोषणकर्ते नारायण जांभुळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने वेळोवेळी माना समाजाच्या पारित केलेल्या आदेशाची अंमलबजावणीकरिता विदर्भातील माना समाजाने शासनाला निवदने दिली होती. मुख्यमंत्री यांनी दखल घेवून दोन महिण्यात परिपत्रक काढू, असे सांगितले. मात्र अजूनही शासनाने परिपत्रक काढले नाही. त्यामुळे विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे हे आमरण उपोषणाला बसले आहे. पोटात अन्न नसल्याने त्यांचा रक्तदाब वाढला आहे. शरिरातील साखरेचे प्रमाणही वाढले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना भरती केले आहे.
त्यांच्या बरोबर शनिवारला तालुक्यातील माजी ग्रा.प. सदस्य रामदास जांभुळे, पंजाबराव दोडके, नगरसेविका हेमलता नन्नावरे, वनिता नन्नावरे, वनिता जांभुळे, सचिन श्रीरामे, सचिन मानगुडधे, सुखदेव ढोणे, सखाराम दोडके, तुकाराम नन्नावरे, अक्षय सोनवाने, चंदू दोडके, आदी माना समाज बांधव साखळी उपोषणाला बसले आहे.
जात प्रमाणपत्र वैधता सहा महिण्यात निकाली काढावी, जनहित याचिका ७१ / २०११ नुसार जलद प्रक्रिया व्हावी यासाठी प्रक्रियेत सुधारणा, ओबीसीच्या जीआरच्या यादीत क्र. २६८ वर मागा चा उल्लेख माना करण्यात आल्याने शुध्दीपत्रक प्रसिद्ध करावे, न्यायालयाच्या आदेशानुसार माना, माने, मानी, इत्यादी एकच असल्याबाबत परिपत्रक काढणे, डोमा गावाजवळील मुक्ताई देवस्थानाला पर्यटनस्थळ घोषित करण्यात यावे, सुरजगाढ किल्ला स्थित डोंगरावरील ठाकूर देव, देवस्थानच्या जवळपास खनन न करण्याचे आदेश द्यावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दीडशे माना समाजबांधव साखळी उपोषणाला बसले आहेत.
अन्यथा उपोषण सोडणार नाही
दरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया,आदिवासी प्रकल्प अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी उपोषणकर्ते नारायण जांभुळे यांना आपल्या मागल्या शासनापर्यत पोहचवितो. आपण उपोषण सोडावे, अशी विनंती केली. मात्र जोपर्यत शासन माना समाजाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी करून परिपत्रक निर्गमित करणार नाही. तोपर्यत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ता जांभुळे यांनी सांगितले.