कोरपना परिसरात शाळाबाह्य मुलांची स्थिती चिंताजनक
By admin | Published: January 18, 2015 11:20 PM2015-01-18T23:20:12+5:302015-01-18T23:20:12+5:30
मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना दुपारचे जेवण दिले जाते. कुपोषणमुक्तीसाठी मोफत पोषण
कोरपना : मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना दुपारचे जेवण दिले जाते. कुपोषणमुक्तीसाठी मोफत पोषण आहार दिला जातो. या सर्व योजनांवर वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पण दुर्दैवाने आजही ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक लहान मुले भंगार, प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करीत भटकत आहेत.
जे वय खेळण्या-बागडण्याचे असते, त्याच वयात या मुलांच्या हातात भिकेचे कटोरे देण्यात येते. गावात भटकून किंवा बसस्थानकावर हातातील ताटात देवाचा फोटो घेऊन ही मुले भीक मागताना दिसतात. शाळेत न जाता भिक्षा मागताना गरज पुर्ण न झाल्यास ही मुले गुन्हेगारीकडे वळतानाही दिसत आहेत. यातूनच पुढे सराईत गुन्हेगार तयार होतात. या मुलांना वेळीच शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.
भटक्या शाळाबाह्य मुलांसाठी किंवा त्यांच्या समाजासाठी आजवर शासनस्तरावर गांभीर्याने विचार झालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शासनाने शाळाबाह्य प्रकल्प राबवून त्यांना दररोज किमान एक तास सक्तीचे शिक्षण आणि पोषण आहार दिला तर त्यांना ज्ञानाचे महत्व कळेल आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण होईल. गावोगावी भीक मागत जीवन जगणाऱ्या या मुलांची संख्याही घटेल आणि गुन्हेगारीचे प्रमाणही कमी होईल, असेही जाणकारांचे मत आहे. त्यामुळे शासनस्तरावर या शाळाबाह्य मुलांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)