तलावांची स्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:27 PM2018-11-24T22:27:26+5:302018-11-24T22:28:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन समजले जाते. मात्र हेच सुरक्षित सिंचन आता धोक्यात आले आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जलाशयात पाणी साठू शकले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. मात्र या तलावातील जलसाठ्याची स्थिती आतापासून चिंताजनक आहे. सरासरी केवळ ३२ टक्क्यांपर्यंत जलसाठा या तलावात शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. गतवषीर शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा मिळाला. मात्र तोही क्षणिक ठरला. यंदाचा खरीप हंगाम संपायला आला तरीही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
आता शेतकरी पुन्हा रबी हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सरासरी ३२ टक्केच पाणी या तलावांमध्ये शिल्लक आहे.
जिल्ह्यात ९७ मामा तलाव
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ४३.७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३८.१५ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १९.४७ टक्के पाणी शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे.