दुकानात काम करणाऱ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:06+5:302021-05-13T04:29:06+5:30
विमा लागू करण्याची मागणी चंद्रपूर : कोरोनामुळे गावागावांत कर्मचारी कामाला लागले आहेत. गावपातळीवर काही कर्मचाऱ्यांचा विमा काढला आहे. ...
विमा लागू करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोनामुळे गावागावांत कर्मचारी कामाला लागले आहेत. गावपातळीवर काही कर्मचाऱ्यांचा विमा काढला आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विमा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजीपाला व्यवसायाकडे अनेकांचे लक्ष
चंद्रपूर : कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा सोडता अन्य व्यवसायांवर निर्बंध आले आहेत; त्यामुळे काही छोट्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बदलला असून ते आता फळ, भाजीपाला, दूध विक्रीकडे वळले आहेत. यामध्ये काहींना विविध वस्त्यांमध्ये जाऊन घरोघरी विक्री सुरू केल्यामुळे काही प्रमाणात का होईना, आर्थिक संकट दूर झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी
चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारात ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी जात असल्यामुळे या बाजारामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, काही ग्राहक आपली वाहने रस्त्यांवर लावत असल्याने येथे भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांना अडचण होत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : काही गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. परिणामी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने घरगुती उपकरणांमध्ये बिघाड होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जंतुनाशकाची फवारणी करावी
चंद्रपूर : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शहरात जंतुनाशक फवारणी मोहीम सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही वॉर्डांत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मच्छरांचा प्रकोप वाढला
चंद्रपूर : शहरातील बालाजी वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून रस्त्यावर कचरा टाकत आहेत.
हातपंप दुरुस्ती करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील काही वॉर्डांमध्ये सार्वजनिक हातपंप आहे. मात्र त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणाम नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पेट्रोल पंपावर गर्दी वाढली
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आला आहे. असे असले तरी सध्या स्थितीत पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.
रेशन दुकानांतही गर्दी
चंद्रपूर : कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. परिणामी गरीब तसेच गरजू नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य घेण्यासाठी गर्दी बघायला मिळत आहेत. अनेक वेळा दुकानदारांसोबत शाब्दिक चकमक उडत आहे.
एटीएममध्ये रक्कम ठेवावी
चंद्रपूर : शहरातील बऱ्याच बँकांच्या एटीएम केंद्रामध्ये पैसेच राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. कोरोनामुळे बँकांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. अनेक वेळा राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये पैसे राहत नसल्याची स्थिती आहे.
अधिकृत बियाणे विकत घ्या
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी आरबीटी, चोरबीटी कापूस बियाणे खरेदी करू नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कृषी विभागाने ७० लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त केले आहेत.