सत्तेसाठी व्यूहरचना सुरू

By admin | Published: October 25, 2015 12:54 AM2015-10-25T00:54:26+5:302015-10-25T00:54:26+5:30

तालुका स्तरावरील मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोंंडपिंपरी ग्रामपंचायतीला गेल्या जून महिन्यात नगरपंचायतीचा दर्जा मिळाला.

The configuration of power continues | सत्तेसाठी व्यूहरचना सुरू

सत्तेसाठी व्यूहरचना सुरू

Next

प्रभागनिहाय आरक्षण जाहीर : गोंडपिंपरी नगरपंचायत निवडणूक
गोंडपिंपरी : तालुका स्तरावरील मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोंंडपिंपरी ग्रामपंचायतीला गेल्या जून महिन्यात नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. आगामी काही दिवसांमध्ये निवडणूक विभागामार्फत नगरपंचायत निवडणूक होऊ घातली आहे. कुठल्याही स्थितीत सत्ता आपल्याच हाती राहावी म्हणून राजकीय मातब्बरांनी कंबर कसली असून व्यूहरचना आखण्यास सुरूवातही केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी महसूल विभागामार्फत नगराचे प्रभागवार आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली असल्याने शहरात निवडणूक रणधुमाळीचे चित्र उभे झाले आहे. जिल्हा सीमेवर वसलेला तसेच आदिवाहीबहुल, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम विस्तारित तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिंंपरी तालुक्यात राजकीय सत्ता स्थापनेसाठी नेहमीच चढाओढीसह स्पर्धा होत असते. यात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना व इतर राजकीय पक्षांची या शहरावर विशिष्ट भाग व जाती समुदायात चांगली पकड आहे. तत्पूर्वी येथे ग्रामपंचायत कालावधीत झालेला भ्रष्टाचार, शहरातील विविध समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आदी कारणांमुळे तसेच अपुऱ्या निधीमुळे गावातील विकास कामे रखडली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गोंडपिंपरी नगर पंचायत व्हावी, ही ग्रामस्थांची मागणी शासनाने पूर्ण केल्याने आता प्रशासनानेही निवडणूकीची तयारी चालविली आहे. त्या पार्श्वभूमीेवर सर्वपक्षीय राजकारण्यांनी या नगरपंचायतीत सत्ता आपल्या हाती राहावी म्हणून जोरदार रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
एकीकडे राजकीय मंडळी तडजोडीच्या राजकारणात गुंतली असताना प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतर पक्ष बंडखोरी, अपक्ष उमेदवारी लढविण्याची भाऊगर्दी तसेच नशीब आजमाऊ पहाणााऱ्यांची अति उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुका स्तरावर राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत काही मातब्बरही उमेदवारी अर्ज दाखल करणार असून शहराच्या कानाकोपऱ्यात निवडणुकीच्या चर्चेला उधाण येऊन वारे वाहत आहे. नागरिकांमध्येही चांगला उमेदवार कोण राहणार, शहर विकासाची सुत्रे कुणाच्या हाती सोपवावी, याची कुजबुज सुरू असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The configuration of power continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.