आधारभुत केंद्रात ऑनलाईन नोंदणीतील १४२० पैकी ४०५ शेतकऱ्यांबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:11+5:302021-05-30T04:23:11+5:30
मूल : कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे असलेल्या आधारभूत केंद्रावर यावर्षी ३६ हजार क्किंटल धान शेतकऱ्यांनी आणले होते. ...
मूल : कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे असलेल्या आधारभूत केंद्रावर यावर्षी ३६ हजार क्किंटल धान शेतकऱ्यांनी आणले होते. यात १४२० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. ३१ मार्चपर्यंत फक्त १०१५ शेतकऱ्यांनी शेतमाल आणला. ४०५ शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रात सूचना देऊनही धान आणले नाही. मग त्या ४०५ शेतकऱ्यांनी आडमार्गाने बोनस हडपण्याच्या उद्देशाने ऑनलाईन नोंदणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आधारभूत केंद्रात धान आधारभूत किमतीसोबतच बोनससुद्धा मिळत असल्याने आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली असल्याचे दिसून आले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे असलेल्या गोदामात शेतमाल भरला असल्याने त्या मालाची उचल करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी सूचना देत नाही तोपर्यत धानाची तोलाई बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने घेतला होता. त्यावेळी शेतकऱ्यांची केविलवाणी स्थिती झाली होती. मात्र प्रशासनाने यात लक्ष घातल्याने तोलाई सुरू करण्यात आली होती. बाजार समिती मूल येथे असलेल्या आधारभूत केंद्रावर १४२० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र प्रत्यक्षात १०१५ शेतकऱ्यांनी ३६ हजार क्किंटल धान आणले. त्यामुळे २३ नोव्हेंबर २० ते ३१ मार्च २१ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना हमी भावानुसार १८६८ रुपये प्रती क्किंटलप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. उर्वरित ४०५ शेतकरी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र धान तोलाईसाठी आधारभूत केंद्रात आणले नाही. यावरुन ४०५ शेतकऱ्यांनी आडमार्गाने बोनस मिळण्याच्या लालसेपोटी ऑनलाईन नोंदणी केली असावी. मात्र त्यांचा डाव फसल्याने ते आधारभूत केंद्रात धान आणू शकले नाही. एकंदरीत ते बोगस शेतकरी असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. यापुढे ऑनलाईन नोंदणी करताना खातरजमा करुनच नोंदणी करण्यात आली, तर खरे शेतकरी हमीभावापासून वंचित राहणार नाही.