जीएसटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमच
By admin | Published: July 2, 2017 12:31 AM2017-07-02T00:31:31+5:302017-07-02T00:31:31+5:30
शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आले आहे.
जुन्याच किमतीत वस्तुंची विक्री : बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी लोकमतने बाजारपेठेतील स्थितीचे अवलोकन केले असता जीएसटीबाबत नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्येही संभ्रमावस्थाच दिसून आली. या कर प्रणालीविषयी अनभिज्ञताच अनेकांमध्ये दिसून आली. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी जुन्याच किमतीत वस्तूंची विक्री केली तर काही व्यापाऱ्यांनी वस्तूंची विक्रीच केली नाही.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बाबत सामान्य नागरिकांमध्ये कुतूहल, संभ्रम बघायला मिळत आहे. याचाच परिणाम बाजारपेठांवरही दिसून आला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू करण्यात आली. याचा चंद्रपुरातील बाजारपेठेवर काही परिणाम झाला का, याविषयीची माहिती घेण्याकरिता लोकमत चमूने शनिवारी बाजारपेठेत फेरफटका मारला. जीएसटीबाबय नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने बाजारपेठत रोजच्या तुलनेत ग्राहकांची गर्दी कमी दिसून आली. लोकमत चमूने काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता व्यापारीही जीएसटीबाबत संभ्रमावस्थेतच दिसून आले. कोणत्या वस्तूवर किती जीएसटी आकारण्यात आली आहे, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी पूर्वीचे वॅट लावूनच शुक्रवारच्या तारखेचे बिल तयार करून वस्तूंची विक्री केली. मात्र काही व्यापाऱ्यांनी १ जुलैपासून वॅट कसे काय लावणार, जीएसटी लावावे तर ते किती टक्के लावावे, या द्विधा मनस्थितीत वस्तूंची विक्रीच केली नाही.
कार्यशाळेचा परिणाम नाही
जीएसटीसंदर्भात व्यापाऱ्यांमध्येही संभ्रम आणि कुतूहल बघायला मिळत आहे. त्यामुळे मागील आठवड्यातच शहरात अनेक ठिकाणी या करासंदर्भातील माहिती देण्यासाठी कार्यशाळासुद्धा घेण्यात आल्या. व्यापाऱ्यांचीही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे व्यापाऱ्यांमधील संभ्रमावस्थेवरून दिसून येते.
व्यापाऱ्यांची नोंदणी सुरू
२० लाख रुपये वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी प्रतिष्ठानांना जीएसटीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. ही उलाढाल असणारे जिल्ह्यात जवळपास पाच हजार ६०० व्यापारी आहेत. यातील बहुतेकांनी जीएसटीची नोंदणी केली आहे. काही व्यापारी आज शनिवारी जीएसटीची नोंदणी करून जीएसटी क्रमांक घेताना दिसून आले.
शुक्रवारीच बाजारपेठेत गर्दी
जीएसटीमुळे वस्तू महाग होतील, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. मात्र तसे होणार नाही, असा दावा शासन करीत आहे. मागील आठवडाभरापासून शहरातील काही दुकानांमध्ये अचानक गर्दी वाढली आहे. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. शुक्रवारी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी दिसून आली होती.
विक्रीकर कार्यालय झाले जीएसटी कार्यालय
१ जुलैपासून देशभर वस्तू व सेवा कर कायदा लागू झाला आहे. त्यामुळे आता विक्रीकर कार्यालयाचे सर्व जिल्हयाचे नाव बदलले आहे. आता चंद्रपूरचे विक्रीकर कार्यालय वस्तू व सेवा कर कार्यालय म्हणून ओळखले जाणार आहे. आज शनिवारी हा नामकरण साहेळा पार पडला.
व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया
शासनाने जीएसटी लागू केले. हा निर्णय अत्यंत चांगला आहे. यामुळे कच्च्या बिलावरील व्यवहार थांबणार आहे. याबाबत अजूनही व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. व्यापाऱ्यांचे अनेक कन्सेप्ट स्पष्ट नाही. मात्र काही दिवसात याबाबत स्पष्टता येईल आणि या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होईल.
-गोपाल विरानी, व्यापारी, चंद्रपूर.
शासनाचा जीएसटीबाबतचा निर्णय चांगला आहे. मात्र नागरिक आणि व्यापाऱ्यांना अजूनही याबाबतची पूर्ण माहिती झालेली नाही. रेडीमेड कपडे वगळता पूर्वी इतर कपड्यांवर कर आकारले जात नव्हते. मात्र त्यावर जीएसटी लागू असल्याने या वस्तू थोड्या महाग होईल. मात्र जीएसटीमुळे अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.
- प्रसन्न बोथरा, कपडा व्यापारी, चंद्रपूर.
जीएसटीबाबत अनेकांच्या मनात गोंधळ उडाला आहे. व्यापाऱ्यांसोबत नागरिकांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे नागरिकांची खरेदी अचानक मंदावली आहे. एरवी रेलचेल असलेल्या बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. वस्तूंवर किती टक्के जीएसटी लावावे, हेच अद्याप कळलेले नाही. त्यामुळे जुन्याच किमतीत विक्री सुरू आहे.
-सूरज शर्मा, मोबाईल व्यापारी, चंद्रपूर.