सोयाबीन बियाणांबाबत शेतकऱ्यांत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 05:38 PM2024-06-07T17:38:31+5:302024-06-07T17:39:08+5:30
Chandrapur : मागील हंगामात सोयाबीनवर झाला होता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील काही वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतातील सोयाबीन बियाणे म्हणून वापर करीत होते. परंतु, मागील हंगामात सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग आल्याने यावर्षी शेतात पिकवलेले बियाणे वापरावे की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चांगलीच संभ्रमता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
मागील हंगामात संपूर्ण विदर्भातील सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग आल्याने सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हाती आलेच नाही. ज्या शेतकऱ्यांना थोडेफार सोयाबीन झाले. त्या सोयाबीनला दरही मिळाला नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात सोयाबीन पेरा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही वर्षांपासून बाजारातून विकत घेतलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. जे उगवले त्याची उतारी कमी झाल्याची शेतकऱ्यांची ओरड होती. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शेतकरी पेरणी करण्याकरिता घरात ठेवलेल्या सोयाबीनचा वापर अधिक प्रमाणात करत होते. ज्या शेतकऱ्यांजवळ घरचे सोयाबीन नाही ते पेरणी करण्याकरिता दुसऱ्या शेतकऱ्याकडून बियाणे घेत होते.
परंतु, मागील हंगामात जे सोयाबीन निघाले त्याचा दाणाही बुरशीजन्य रोगाने बारीक झाला. मागील हंगामात सोयाबीनला रोगाने पछाडल्याने यावर्षी त्या हंगामात घरी ठेवलेले सोयाबीन वापरणे योग्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विदर्भाच्या बाहेर मध्य प्रदेश व इतर राज्यातील सोयाबीन पिकावर रोग आला नव्हता. त्यामुळे तिथून येणारे सोयाबीन बियाणे योग्य असल्याचे मानले जात आहे. सोयाबीन पेरणीचे दिवस जवळ आले. त्यामुळे घरचे सोयाबीन पेरणीकरिता वापरावे की विकत सोयाबीन बियाणे घेऊन पेरणी करावी, या संभ्रमात शेतकरी अडकल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळी सोयाबीनची लागवड कमी
सोयाबीन बियाणांकरिता शेतकरी उन्हाळी सोयाबीनची लागवड करतात. परंतु, मागच्या हंगामातील अनुभव लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन फार कमी प्रमाणात घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवणार असल्याचे दिसून येत आहे.
मागील हंगामातील सोयाबीन बियाणे म्हणून वापरू नये, उन्हाळ्यात सोयाबीन पीक घेतले असेल तर त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करूनच बियाणे म्हणून वापरावे.
- सुशांत लव्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी, वरोरा.