बदललेल्या प्रश्नपत्रिकेमुळे शिक्षकांत संभ्रम
By admin | Published: October 5, 2015 01:37 AM2015-10-05T01:37:33+5:302015-10-05T01:37:33+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत महाराष्ट्रातून पंचायत समिती, तालुकास्तरावर इयत्ता नववीच्या प्रथम भाषा मराठीच्या बदललेल्या ...
प्रचंड नाराजी : दोषयुक्त आॅनलाईन प्रशिक्षण
भिसी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत महाराष्ट्रातून पंचायत समिती, तालुकास्तरावर इयत्ता नववीच्या प्रथम भाषा मराठीच्या बदललेल्या प्रश्न पत्रिकेसंदर्भात नुकतेच आॅनलाईन प्रशिक्षण झाले.या प्रशिक्षणात इयत्ता नववी मराठी प्रथम भाषेच्या प्रश्नपत्रिकेचे पूर्ण स्वरूप बदलून कृतिपत्रिकाच्या संदर्भात माहिती देण्यात आली. अभ्यासक्रम न बदलता प्रश्नपत्रिका बदलल्यामुळे व ‘कृतिपत्रिका’ असे नवीन नाव समोर आल्यामुळे इयत्ता नववीला मराठी विषय शिकविणारे शिक्षक गोंधळून गेले आहेत.
सत्र २०१५-१६ सुरू होण्यापूर्वी जूनमध्ये सदर प्रशिक्षण झाले असते तर शिक्षकांना सुरुवातीपासून प्रश्नपत्रिका बदलाची माहिती मिळून कृतिपत्रिका विद्यार्थ्यांना सांगता आली असती. परंतु असे न होता प्रथम सत्र परीक्षेचा अर्धाअधिक अभ्यासक्रम झाल्यानंतर महाराष्ट्र शिक्षण मंडळाने कृतिपत्रिकेचा नाविण्यपूर्ण बदल महाराष्ट्रातील मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या माथी मारला. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
नवीन बदलात शिक्षकानांही स्वत:ची सृजनशीलता, चिंतन व अभ्यासाने अनुभवाने कृती करावयाची असल्यामुळे त्याच्या मागचे काम वाढून कृतिपत्रिका डोकेदुखी ठरली आहे, असे अनेक शिक्षकांनी प्रशिक्षण संपल्यानंतर मनोगत कथन केले. नमुनादाखल कृतिपत्रिकेत भौमितीक आकृत्यांवर जास्तीत जास्त भर देऊन मराठी भाषेची चिरफाड केली आहे, अशी प्रतिक्रिया मराठी संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दीपक नवले यांनी या संदर्भात दिली आहे. (वार्ताहर)