मनपाच्या ऑनलाईन आमसभेतील नगरसेवकांचा गोंधळ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:49+5:302021-06-02T04:21:49+5:30
सोमवारी महापालिकेची ऑनलाईन आमसभा पार पडली. या सभेमध्ये नगरसेवकांचा एकच गोंधळ होता. कुणीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे चित्र ...
सोमवारी महापालिकेची ऑनलाईन आमसभा पार पडली. या सभेमध्ये नगरसेवकांचा एकच गोंधळ होता. कुणीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे चित्र बघायला मिळाले. विशेष म्हणजे, आपण ऑनलाईन आहो हेसुद्धा काही नगरसेवक विसरल्याचे चित्र होते. यासंदर्भात येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर चांगलेच संतापले. त्यांनी मनपाच्या ऑनलाईन सभेचे चित्रीकरण थेट फेसबुकवर व्हायरल केले. त्यानंतर नगरसेवक आमसभेमध्ये आपले कसे मत मांडतात, हे ऐकूण न घेता कसा गोंधळ करतात, हे नागरिकांना कळले. विशेष म्हणजे, व्हायरल व्हिडिओमध्ये कोण बोलत आहे आणि काय विषय सुरू आहे, हे सुद्धा समजण्यापलीकडे आहे. काही नगरसेवक आपल्याला काहीच ऐकायला येत नसल्याची तक्रार करीत असल्याचेही बघायला मिळाले. ही आमसभा आहे की कोंबळ बाजार अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
महापालिकेेची सभा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असते. अशा गोंधळामुळे काय विषय आहे आणि कोणते विषय चर्चेला आले हे सुद्धा समजण्यापलीकडे असल्याचे या व्हिडिओवरून बघायला मिळाले.
बाॅक्स
सोशल मीडियावर अशा रंगल्या चर्चा
नगरसेवकांना प्रथम ऑनलाईन सभेमध्ये कसे बोलायचे याचे प्रशिक्षण द्यावे, त्यानंतरच सभा घ्यावी. जनतेच्या हितासाठी या नगरसेवकांना पाठविले आहे. मात्र, तेच असा गोंधळ करीत असेल तर सामान्यांच्या प्रश्नाचे काय, असा सवालही अनेकांनी फेसबुकच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर काही नागरिकांनी कोंबळ बाजारासारखी आपल्या महापालिकेतील नगरसेवकांची स्थिती असल्याचेही मत व्यक्त केले आहे.
कोट
आमसभेच्या माध्यमातून शहरातील समस्यांवर, विकासकामांवर तसेच नवनवीन योजनांवर चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, ऑनलाईन सभेमध्ये सर्वत्र गोंधळ होत आहे. कोण काय बोलतात हे समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे आमसभा ऑनलाईन न घेता सोशल डिस्टन्स ठेवून ऑफलाईन घ्यावी, म्हणजे प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळेल.
-सचिन भोयर
नगरसेवक, चंद्रपूर