शहरातील पाणी प्रश्नावर मनपाच्या सभेत गोंधळ

By admin | Published: November 28, 2015 01:59 AM2015-11-28T01:59:07+5:302015-11-28T01:59:07+5:30

शहरातील पाणी पुवठ्याच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर, आयुक्तांनी विशेष आमसभा घेण्याचे आश्वासन दिले होते.

Confusion in Municipal Council meeting on water issue | शहरातील पाणी प्रश्नावर मनपाच्या सभेत गोंधळ

शहरातील पाणी प्रश्नावर मनपाच्या सभेत गोंधळ

Next

आयुक्त निरूत्तर : अस्वच्छता, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावर नाराजी
चंद्रपूर : शहरातील पाणी पुवठ्याच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर, आयुक्तांनी विशेष आमसभा घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, चार महिने लोटूनही त्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न आजही कायम आहे. शुक्रवारी झालेल्या मनपाच्या आमसभेत नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर संताप व्यक्त करून आयुक्तांना धारेवर धरले. त्यामुळे मनपाची सभा चांगलीच गाजली.
दुपारी १ वाजता नवीन इमारतीच्या सभागृहात मनपाची सभा सुरू झाली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, आयुक्त सुधीर शंभरकर उपस्थित होते.
शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न निता खनके, सकिना अन्सारी, संजय वैद्य यांनी उपस्थित केला. तुकूम परिसरातील पाणी शुद्धीकरण यंत्र मागील काही महिन्यांपासून बंदवस्थेत आहे. नदीतील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नळाद्वारे पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन पाण्याच्या टाकीचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले असून, काही भाग खचला आहे. त्यामुळे लोखंडी सळाखी बाहेर आल्या आहेत, असे नगरसेवकांनी म्हटले.
नगरसेवक संजय वैद्य, आयुक्त सुधीर शंभरकर व अभियंता हे काही दिवसाअगोदर या सर्व भागांची पाहणी करुन आले. त्यामुळे आजच्या सभेत यावर काही तोडगा निघेल, अशी नगरसेवकांना आशा होती. मात्र, पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आयुक्त शंभरकर कोणतीच भूमिका घेत नसल्याने नगरसेवक आक्रमक झालेत. त्यामुळे पाणी प्रश्नावर विशेष आमसभा घेण्याच्या आश्वसनाची महापौरांना यावेळी आठवण करून देण्यात आली.
तुकूम परिसरात खनिज विकास निधीतून दोन कोटींची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. मात्र, मुख्य पाइपलाइनला ही नवीन लाइन जोडण्यात आली नाही. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेला आहे. या परिसरात पाणी गळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचेही वैद्य यांनी यावेळी सांगितले.
एलबीटी बंद झाल्यामुळे मनपाने उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण करण्याचे ठरविले. त्यानुसार अमरावती येथील एका कंपनीला कोट्यवधी रुपयांचे सर्वेक्षणाचे काम दिले. मात्र, या कंपनीला कामाबाबतचा अनुभव नसल्याने सर्वेक्षणाबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
कराची आकारणी करताना नवीन घर, जुने घर, अशी वर्गवारी करणे गरजेचे होते. परंतु सर्व घरांना सरसकट सारखा कर आकारला गेल्याने जुन्या घरमालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचा प्रश्न नगरसेवक आकाश साखरकर यांनी उपस्थित केला.
त्यानंतर आयुक्त शंभरकर यांनी कंपनीच्या कामाची चौकशी करण्याचे यावेळी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)
महापौर चषक स्पर्धा
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महापौर चषक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या संदर्भात महापौरांच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी २९, ३० व ३१ जानेवारी २०१६ ला गांधी चौकात कुस्ती स्पर्धा, ५, ६ व ७ फेब्रुवारीला कोनेरी सभागृहात कबड्डी स्पर्धा घेण्याचे ठरले. त्यानंतर गायकांची तारीख निश्चित झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल. यासोबतच नाटक, झाडीबोली लावणी, दंडार, आदिवासी नृत्य, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे.

Web Title: Confusion in Municipal Council meeting on water issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.