मनपातील अधीक्षक पद भरतीवर संभ्रम
By admin | Published: November 19, 2014 10:37 PM2014-11-19T22:37:31+5:302014-11-19T22:37:31+5:30
महानगर पालिकेद्वारे शहरातील आरोग्यकेंद्रांमार्फत तीन ते साडेतीन लाख नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जात आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधीक्षकपदाची गरज आहे.
चंद्रपूर : महानगर पालिकेद्वारे शहरातील आरोग्यकेंद्रांमार्फत तीन ते साडेतीन लाख नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जात आहे. या केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधीक्षकपदाची गरज आहे. नोडल अधिकारी तथा माहिती अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी ही भरती प्रक्रिया राबविली नसल्याचे, तर उपायुक्तांनी अपिलीय सुनावणीमध्ये भरतीचे आवेदनपत्र स्वीकारल्याची माहिती दिली. मनपातील दोन जबाबदार अधिकाऱ्यांनी वेगवेगळी माहिती दिल्याने ही भरती प्रक्रिया राबविली किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
माहिती अधिकारात अपुरी माहिती दिल्याने याविरोधात राज्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अडीच वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. शासन अनुदानित जीआयए अंतर्गत पाच, तर आरसीएच फेज टू अंतर्गत पाच, अशा एकूण दहा आरोग्य केंद्रामार्फत नगरवासीचे आरोग्य सांभाळल्या जात आहे. या आरोग्य केंद्रांवर आरोग्य वैद्यकीय अधीक्षक नियंत्रण ठेवून असतात. मात्र मागील अनेक वर्षापासून या पदाची भरती प्रक्रिय राबविण्यात आलेली नाही.
नगरपालिका अस्तित्वात असताना तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी १ आॅगस्ट २००९ रोजी डॉ. अंजली आंबटकर यांची नोडल आॅफिसर (आसीएच) म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हापासून तर आजतागायत डॉ. आंबटकर या महानगरातील आरोग्यकेंद्रांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. यासंदर्भात नितीन बन्सोड यांनी माहितीच्या अधिकारातून आरोग्य वैद्यकीय अधीक्षक या पदासंदर्भात माहिती मागितली. तेव्हा माहिती अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती दिली. परंतु स्वत:च्या शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली नाही.
त्यामुळे बन्सोड यांनी उपायुक्तांकडे प्रथम अपील केले. त्यानुसार झालेल्या सुनावणीत उपायुक्तांनी या भरती प्रक्रियेत आवेदन स्वीकारल्याचे सांगितले. परंतु या पदाच्या पात्रतेची माहिती न दिल्याने बन्सोड यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील सादर केले आहे. या पदासाठी वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि स्वच्छता, साथ आजार व अन्य कामांचा सात वर्षाचा अनुभव, अशी पात्रता ठरविण्यात आली आहे. ही पात्रता डॉ. आंबटकर यांच्याकडे नसल्याने ही भरती प्रक्रिया पारदर्शक राबवावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)