जीएमसीमध्ये न्युओनेटल व्हेन्टिलेटरच्या खरेदीत घोळ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 05:00 AM2022-04-18T05:00:00+5:302022-04-18T05:00:33+5:30
कोरोना संकट काळातील दुसऱ्या लाटेमध्ये बालकांवर कोरोना संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी संपूर्ण राज्यभर बालरुग्णालय सज्ज करण्यात आले होते. दरम्यान, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागामध्येही अत्याधुनिक साधनसामग्री मागविण्यात आली. याच काळामध्ये येथे चार न्युओनेटल व्हेन्टिलेटर पुरवठादाराकडून पुरविण्यात आले आहे. मात्र, मागण्यात आलेले आणि पुरवण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा संशय नागरिकांना आहे.
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ईसीआरसी-२ प्रोजेक्ट अंतर्गत न्युओनेटल व्हेन्टिलेटर खरेदी करण्यात आले आहे. मात्र, खरेदी करण्यात आलेल्या या व्हेन्टिलेटरच्या दर्जावरून आता संशय असून यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून माहिती अधिकारातून अनेकांनी माहिती मागितली आहे. एकाच विषयावरून अनेकांनी माहिती मागितल्यामुळे या खरेदीमध्ये मोठा घोळ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोरोना संकट काळातील दुसऱ्या लाटेमध्ये बालकांवर कोरोना संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासाठी संपूर्ण राज्यभर बालरुग्णालय सज्ज करण्यात आले होते. दरम्यान, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागामध्येही अत्याधुनिक साधनसामग्री मागविण्यात आली. याच काळामध्ये येथे चार न्युओनेटल व्हेन्टिलेटर पुरवठादाराकडून पुरविण्यात आले आहे. मात्र, मागण्यात आलेले आणि पुरवण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा संशय नागरिकांना आहे. तांत्रिकदृष्टीने ते योग्य नसल्याचेही आता बोलले जात आहे. विशेष म्हणजे, चार व्हेन्टिलेटर खरेदीसाठी एक कोटी रुपये मोजल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे काहींनी यासंदर्भात माहिती अधिकारातून माहिती मागून खरेदीतील
बारकावे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
काय आहे संशय
पुरविण्यात आलेले व्हेन्टिलेटरसोबत आलेल्या ॲसेसरी योग्य नसल्याचा संशय आहे. तसेच कमी किमत असतानाही अधिक किमतीत खरेदी केल्याचे, तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आरटीई कार्यकर्त्यांना संशय आहे.
अडीच कोटींचे १० व्हेन्टिलेटर येणार?
जिल्ह्याची लोकसंख्या आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भार बघता येथे अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे. यासाठीच जिल्हा नियोजनमधून आणखी अडीच कोटी रुपये खर्चून १० व्हेन्टिलेटर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.