रोहयोच्या विहिरीवरून ‘स्थायी’मध्ये गोंधळ
By Admin | Published: October 14, 2016 01:16 AM2016-10-14T01:16:17+5:302016-10-14T01:16:17+5:30
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन विहिरी बांधून दिले जात आहेत.
शेतकऱ्यांची देयके अडले : पदाधिकारी निष्क्रीय असल्याचा आरोप
चंद्रपूर : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन विहिरी बांधून दिले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांनी विहिरीचे बांधकाम पूर्ण करूनही त्यांना देयके अदा केली जात नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची पाळी आली आहे. याला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निष्क्रीयता जबाबदार आहे. देयके प्रलंबित ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी लावून धरल्याने गुरूवारी पार पडलेली जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली.
जिल्हा परिषदेकडून रोहयो अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी बांधून दिले जात आहेत. या विहिरीसाठी तीन लाख रूपयाचे अनुदान आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींचे बांधकाम केले. मात्र बांधकाम पूर्ण होवूनही अनुदानासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी बैलजोडी, जनावरे विकून विहिर बांधकामात पैसा लावला. मात्र जिल्हा परिषद प्रशासन अनुदान वितरीत करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कामात कोट्यवधी रूपयाच्या रॉयल्टीची बुडवणूक झाली असून सर्व बीडीओ, तहसीलदारांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामसेवक व कंत्राटदार मिळून कोट्यवधी रूपये बुडविल्याचा मुद्दा गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी लावून धरला. यावेळी या सर्व विहिर बांधकामाची चौकशी करून देयके अडवून ठेवणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन सभाध्यक्षांनी दिले. या सभेत कॅरेटचाही मुद्दा चर्चेला आला. जिल्हा परिषद शाळांना इको-फ्रेंडली डेक्स-बेंच पुरविण्याला सभेत मंजूरी नाकारण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
बांधकामासाठी जनजागृती मात्र अनुदानाचा पत्ता नाही : सतीश वारजूकर
रोहयोअंतर्गत बांधण्यात आलेल्या शेकडो विहिरींचे अनुदान रखडले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाभर दौरा करून नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करीत आहेत. मात्र प्रत्यक्ष शौचालय बांधकामासाठी निधीच उपलब्ध करून दिले जात नसल्याची स्थिती आहे. कंत्राटदारांचीही देयके अडली असून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी केवळ आपली पोळी शेकून घेण्यात व्यस्त असल्याचा आरोप गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी केला आहे.
विनोद अहीरकर यांचा सभात्याग
चिमूर तालुक्यात रोहयो अंतर्गत अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली. या कामात प्रचंड घोळ झाल्याचा मुद्दा मागील सभेत गाजला होता. त्यावेळी चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने काय चौकशी केली व कुणावर काय कारवाई करण्यात आली, हा मुद्दा जि. प. सदस्य विनोद अहीरकर यांनी सभेत लावून धरला. यावेळी जि. प. अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी चालू मुद्यावर बोला, असे सांगून प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याने विनोद अहीरकर यांनी सभात्याग करून आपला रोष व्यक्त केला. गैरव्यवहार करणाऱ्यांना जि. प. अध्यक्ष पाठीशी घालत असून रोहयोच्या रस्ते कामात प्रचंड घोळ झाला आहे. यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी वसूली केल्याचा आरोप अहीरकर यांनी केला आहे.