मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:16+5:302021-05-29T04:22:16+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर या गावात सन 2019- 20 च्या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बस थांबा ते ...
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जनकापूर या गावात सन 2019- 20 च्या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बस थांबा ते गावापर्यंत डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम मंजूर करण्यात आले. सदर बांधकामाकरिता शासनातर्फे एक करोड ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. हे बांधकाम वडसा येथील एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे करण्यात आले. परंतु या बांधकामात प्रचंड घोळ असल्याचा आरोप जनकापूर येथील सरपंच वैशाली गायधने व ग्रा.पं. सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तालुक्यातील जनकापूर हे गाव नागपूर -चंद्रपूर महामार्गाला लागून रोडपासून काही अंतरावर आहे. या गावाला सन 2019-20 च्या आर्थिक वर्षांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बस थांबा ते गावापर्यंत डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम मंजूर करण्यात आले. आणि सदर बांधकामाकरिता शासनातर्फे एक करोड ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. हे बांधकाम वडसा येथील एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे पूर्ण करण्यात आले. परंतु या बांधकामात प्रचंड घोळ असल्याचा आरोप नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. या बांधकामात ग्रामपंचायतीत कुठल्याही प्रकारे नोंद करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर नियमानुसार रुंदीकरण करण्यात आले नाही. रोडची जाडीही कमी केली, जुन्या डांबररोडवर नवीन डांबरीकरण करण्यात आले. नाली बांधकामसुद्धा योग्य प्रकारे करण्यात आले नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार सिमेंट रोडनुसार ६०० मीटर नाली बांधकाम करायला पाहिजे. ते ५२० मीटर नाली बांधकाम करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करून काम सुरळीत करावे. अशी मागणी ग्रामपंचायत तथा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला सरपंच वैशाली गायधने, उपसरपंच महेश रामटेके, ग्रा.पं. सदस्य तुकाराम बारसागडे, शारदा सूर्यवंशी, शुभांगी डहारे, लक्ष्मी मसराम आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कोट
सदर बांधकाम सुरू असताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेण्यात आले नाही. आणि ग्रामपंचायतने बांधकामाबाबत आक्षेप घेतला असता कामावरील सुपरवायझर यांनी उडवाउडवीचे उत्तर देत वाटते तिथे कुठेही तक्रार करू शकता, अशी मग्रूरीची भाषा वापरली.
-वैशाली गायधने, सरपंच
ग्रामपंचायत,जनकापूर
ता. नागभीड