प्रकल्पग्रस्तांच्या गुंडाळलेल्या उपोषणामागे भाजपा समर्थकांना काँग्रेसची धास्ती

By admin | Published: February 12, 2017 12:38 AM2017-02-12T00:38:42+5:302017-02-12T00:38:42+5:30

वेकोलिच्या सास्ती क्षेत्रातील जवळपास हजार प्रकल्पग्रस्तांचे सुरू असलेले आंदोलन सातव्या दिवशी आपल्या भेटीनंतर अधिक तीव्र करण्याचा निर्णय झाला होता.

Congrats to the supporters of Congress party against the winding up of project affected people | प्रकल्पग्रस्तांच्या गुंडाळलेल्या उपोषणामागे भाजपा समर्थकांना काँग्रेसची धास्ती

प्रकल्पग्रस्तांच्या गुंडाळलेल्या उपोषणामागे भाजपा समर्थकांना काँग्रेसची धास्ती

Next

सुभाष धोटे : मध्यरात्री उपोषण सोडविण्याची घाई कशासाठी ?
राजुरा : वेकोलिच्या सास्ती क्षेत्रातील जवळपास हजार प्रकल्पग्रस्तांचे सुरू असलेले आंदोलन सातव्या दिवशी आपल्या भेटीनंतर अधिक तीव्र करण्याचा निर्णय झाला होता. मात्र हे आंदोलन निर्णायक वळणावर आले असतानाच त्याच रात्री भाजपा समर्थक कंपुने ताबडतोब केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांना बोलावले. उपोषणकर्त्यांना वेकोलिच्या उच्चधिकाऱ्यांनी आधीच दिलेली तीच आश्वासने त्यांनी पुन्हा दिली आणि कसलाही ठोस निर्णय न देता निर्णायक वळणावर असलेले आंदोलन अचानक गुंडाळले, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे.
या संदर्भात सुभाष धोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आमरण उपोषण २ फेब्रुवारीपासून सुरू होते. उपोषण मंडपात अनेक राजकीय पक्षाचे नेते आणि वेकोलिच्या उच्चाधिकाऱ्यांकडून भेटी देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. ८ फेब्रुवारीला दुपारी आपण शिष्टमंडळासह भेट दिली. उपोषणकर्त्यांची मते व समस्या जाणून घेऊन आंदोलन आणखी तीव्र करण्याचा संकल्प जाहीर केला. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे, राजुरा नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अशोक देशपांडे, वेकोलि इंटकचे एरिया सचिव सुदर्शन डोहे, ईश्वर गिरी, विश्वास साळवे, नंदु वाढई आदी यावेळी हजर होते. त्यांच्यासमोर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी भाजपा सरकार, त्यांचे मंत्री आणि वेकोलि अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भावना व्यक्त केल्या होत्या. या भावना लक्षात घेवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसची कामगार संघटना इंटक स्वस्त बसणार नाही असे आपण जाहीर केले होते. संबंधित शेतकऱ्यांना समर्थन देत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा व्यक्त केला होता. सरकार विरोधात आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता लक्षात घेऊन या घडामोडीवर लक्ष ठेवून असलेल्या काही भाजपा समर्थकांनी ताबडतोब त्याच रात्री ना. अहीर यांना बोलावून घेतले आणि लिंबुपाणी पाजून केवळ वेळकाढू आश्वासनांवर समाधान मनायला लावले व मध्यरात्री आंदोलन गुंडाळले, असा आरोप त्यांनी केला आहे.
या आधीही केंद्रीय मंत्र्यांनी उपोषण स्थळास दोनदा भेट दिली होती. मात्र त्यांच्या मध्यस्थीला उपोषणकर्त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.
परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन पुन्हा तीव्र होईल, निवडणूक काळात हे उपोषण सरकार विरोधात मतदारांमध्ये असंतोषाला खतपाणी घालेल या भीतीपोटी उपोषण थांबविल्याचा आरोप सुभाष धोटे यांनी केला आहे. परिसरातील शेतकरी सरकारच्या आडमुठ्या व संधीसाधू धोरणामुळे स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची सर्वच बाजूने पिळवणूक व लुट सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना व जिल्ह्याचे दोन मंत्री असतानाही परिसरातील शेतकऱ्यांना आमरण उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा लागणे हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congrats to the supporters of Congress party against the winding up of project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.