विसापूर ग्रामपंचायतीत काँग्रेस-भाजपात सत्ता संघर्ष
By admin | Published: July 23, 2015 12:53 AM2015-07-23T00:53:22+5:302015-07-23T00:53:22+5:30
बल्लारपूर तालुक्यात विसापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. यामुळे राजकीय पक्षाने येथील राजकारणावर लक्ष ..
ग्रामपंचायत निवडणूक : आज होणार उमेदवारांचे चित्र स्पष्ट
बल्लारपूर: बल्लारपूर तालुक्यात विसापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. यामुळे राजकीय पक्षाने येथील राजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथील १७ जागेसाठी तब्बल ६८ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करुन विक्रम केला आहे. उद्या गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याचवेळी उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून विसापूर ग्रामपंचायतीच्या राजकारणात काँग्रेस भाजपात सत्तासंघर्ष दिसून येत आहे.
विसापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मध्ये नामाप्र जागेसाठी एकूण पाच उमेदवारांनी नामांकन दाखल केले. येथे काँग्रेसचे सचिन टोंगे व भाजपाचे विलास भोयर यांच्यात सामना आहे. याच प्रभागातील अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी सहा महिलांनी एका जागेसाठी दावा केला. लढत मात्र रिता जिलठे व पुष्पा खैरकर यांच्यात होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी शारदा डाहुले व गीता उलमाले एकमेकींना आव्हान देत आहेत. येथील प्रभाग दोनमध्ये नामाप्र महिला राखीव जागेसाठी वैष्णवी पिंपळकर आणि निता वनकर यांच्यात संघर्ष आहे. सर्वसाधारण जागेवर विनोद गिरडकर व प्रमोद ठाकूर यांच्यात दुहेरी लढत आहे.
येथील प्रभाग तीनमधील अनुसूचित जाती वर्गाच्या एका जागेसाठी एकूण पाच उमेदवार असलेतरी मुख्य सामना विजय वैद्य व सरोज गाडगे यांच्यात होण्याची शक्यता आहे. येथील नामाप्र राखीव जागेवर चार उमेदवारांपैकी सुनिल रोंगे व रवींद्र कोट्टलवार यांच्यात लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर तीनपैकी सुरेखा कोडापे व विमला कोव ेयांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. प्रभाग चारमध्ये अनुसूचित जमाती राखीव जागेसाठी सहा जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये सन्नी टेकाम व प्रकाश सिडाम यांच्यात लढतीचे चित्र आहे. अनुचूचित जाती महिला राखीव एका जागेसाठी चौघीनी दावा केला. मात्र सुरेखा दुर्गे व सरला भोयर यांच्यात संघर्ष दिसून येते. याच प्रभागात नामाप्र महिला राखीव जागेवर मालन कोडेकर व सुरेखा इटनकर यांच्यातील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी चौघांनी उमेदवारी दाखल केली. मात्र लढत तिरंगी होण्याची शक्यता असून प्रशांत चिकाटे यांना दिनेश पुडके व भारत जीवने शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नामाप्र महिला राखीव जागेवर सरीता झाडे व शारदा पेटकर यांच्यात लढतीचे चित्र निर्माण झाले.
प्रभाग सहामधील अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर उज्वला कोडापे व सुजिता कोरवते, सर्वसाधारण महिला जागेसाठी मुक्ताबाई रोहणकर व मिना जुमनाके तर सर्वसाधारण जागेसाठी गौचरज नाग व अशोक थेरे यांच्यात लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
८ हजार ९५३ मतदार करतील मतदान
विसापूर ग्रामपंचायतीच्या ४ आॅगस्ट रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ८ हजार ९५३ इतकी आहे. यात चार हजार ६२४ पुरुष व ४ हजार ३२९ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण सहा प्रभागासाठी प्रत्येकी दोन असे एकूण १२ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येथील प्रभाग एकमध्ये एक हजार ६७१, प्रभाग दोन ९७८, प्रभाग तीन सर्वाधिक एक हजार ९०९, प्रभाग चार एक हजार ५७३, प्रभाग पाच एक हजार ४१९ तर प्रभाग सहामध्ये एकूण एक हजार ४०३ मतदारांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे.
चार रंगात राहणार मतपत्रिकेचा नमुना
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण चार रंगात मतपत्रिकेचा नमुना ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेसाठी पांढऱ्या रंगाची, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी फिका हिरवा व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी फिका गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेचा नमुना राहणार आहे. मतदारांना पसंतीच्या उमेदवारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सदर सुविधा निर्माण करण्यात आली आहे.