चार ग्रा.पं.वर काँग्रेस तर एकावर भाजपाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:14+5:302021-07-26T04:26:14+5:30
चिमूर तालुक्यातील सातारा, गडपिपरी, नवतळा, वाकर्ला, साठगाव आणि कोलारी या गावच्या निवडणुका झालेल्या होत्या. यात आरक्षण सोडत निघालेल्या होत्या. ...
चिमूर तालुक्यातील सातारा, गडपिपरी, नवतळा, वाकर्ला, साठगाव आणि कोलारी या गावच्या निवडणुका झालेल्या होत्या. यात आरक्षण सोडत निघालेल्या होत्या. परंतु निवडणूक संपन्न झाल्यानंतर त्या आरक्षणाचा उमेदवारच या ग्रामपंचायतीमध्ये निवडून न आल्यामुळे सरपंचपद रिकामे ठेवण्यात आले होते. तोपर्यंत या ग्रामपंचायतचा कारभार उपसरपंच यांच्याकडे सोपविण्यात आलेला होता. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण नव्याने जाहीर करण्यात आले आहे. त्यात कोलारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काही तांत्रिक कारणामुळे काढण्यात आलेले नाही. सातारा, वाकर्ला येथे अनुसूचित जमाती तर गडपिंपरी, नवतळा, साठगाव येथे अनुसूचित जातीसाठी आरक्षण घोषित करण्यात आले आहे. साठगाव येथे काँग्रेसचे अक्षय नरेश मेश्राम, वाकर्ला येथे काँग्रेसचे लक्ष्मी तुमराम, नवतळा येथे काँग्रेसचे कुंडलिक हरिश्चंद्र मेश्राम, गडपिपरी येथे काँग्रेसचे जयमाला बोरकर तर सातारा येथे भाजपाचे गजानन गुळधे सरपंचपदी विराजमान झाले आहे.