काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंसह इतरांवर अॅट्रासिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 04:59 AM2019-04-25T04:59:50+5:302019-04-25T05:00:00+5:30
राजुरा लैंगिक अत्याचार प्रकरण; असंवेदनशील वक्तव्य अंगलट
चंद्रपूर : राजुरा येथील एका खासगी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन आदीवासी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी केलेले असंवेदनशील वक्तव्य जिल्ह्यातील तीन बड्या काँग्रेस नेत्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. येथील रामनगर पोलीस ठाण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह इतरांवर बुधवारी रात्री अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. अत्याचाराची घटना घडलेले वसतिगृह ज्या संस्थेचे आहे त्याचे अध्यक्षही धोटेच आहेत.
अत्याचाराची घटना १३ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणात न्यायालयाने दोन महिलांसह पाच जणांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजुरा येथे संतप्त आदिवासी बांधवांनी काढलेल्या मोर्चातील जनभावना लक्षात घेता दाखल केलेल्या याचिकेवर नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा न्यायाधीश अंसारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एसआयटी गठित केली आहे.
तीन वेगवेगळ्या यंत्रणा तपास करीत असताना काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे व लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुलींचे पालक शासकीय मदतीसाठी तक्रारी करीत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे संपूर्ण विदर्भात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तसेच सुभाष धोटे यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर माफी मागितली.
दरम्यान, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात आदिवासी संघटनांनी तक्रारी सादर करून या तीनही नेत्यांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष कमलेश आत्राम यांच्या तक्रारीवरून सुभाष धोटे यांच्यासह इतरांविरुद्ध कलम ३, १ (आर) अनुसूचित जाती-जमाती सुधारित अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सीआयडी चौकशी करण्याची मागणी
राज्य महिला आयोगानेही आ. वडेट्टीवार, धोटे व धानोरकर यांना असंवेदनशील वक्तव्याबद्दल नोटीस बजावली असून ३० एप्रिलपर्यंत स्वत: उपस्थित राहून खुलासा करण्याचे निर्देशही दिले आहेत. या लैंगिक अत्याचार प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मर्दानी महिला आस्था मंचच्या अध्यक्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केली.