तर टळली असती काँग्रेसची घसरण

By admin | Published: October 25, 2014 01:08 AM2014-10-25T01:08:29+5:302014-10-25T01:08:29+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांंवरील निकाल काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. ..

The Congress had to survive | तर टळली असती काँग्रेसची घसरण

तर टळली असती काँग्रेसची घसरण

Next



गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा जागांंवरील निकाल काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे. गेल्या २००९ च्या निवडणुकीत जिल्ह्यात सहापैकी तीन जागा या पक्षाकडे होत्या. यावेळी केवळ एकमेव जागा राखण्यात पक्षाला यश आल्याने जिल्ह्यातील यशापयशावर मंथन करण्याची पाळी काँग्रेसजनांवर आली आहे.
राजुरा विधानसभा मतदार संघातील जागा सुभाष धोटे सहज काढतील, असा विश्वास सर्वांनाच होता. खुद्द उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्तेही आधीपासून विजयाची हमी बाळगून होते. पक्षानेही ही जागा गृहित धरल्यासाखीच होती. नेमका घात येथेच झाला. शत्रू कितीही दुबळा असला तरी त्याला बलवानच समजले पाहिजे, असे राजनिती सांगत असतानाही याकडे दुर्लक्ष झाले. भाजपाचे संजय धोटे यांची ताकद गृहित धरण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवारावर लक्ष ठेवण्यातच शक्ती खर्ची झाली. राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा फटका बसला. ज्या गडचांदुरात नगरपालिका मिळाली, त्या शहरातून आणि खुद्द राजुरातील काही बुथवरून घसरण झाली. अवघ्या दोन हजार २७८ मतांनी पराभव बघावा लागला. सहज निवडून येण्यासारखी स्थिती असतानाही अखेरच्या क्षणी झालेल्या बेफिकीरीने काँंग्रेसला ही हातची जागा गमवावी लागली.
चिमुरात अविनाश वारजुकर यांचे नाव संभाव्य विजेत्यांमध्ये चर्चेत घेतले जायचे. वारजुकरांसाठी चिमुरात वातावरण चांगले होते. विजय वडेट्टीवारांनी गेल्या १० वर्षात तयार केलेल्या प्लॅटफार्मवर खुद्द अविनाश वारजुकर आणि त्यांचे बंधु सतीश वारजुकर यांचेही काम गेल्या दोन वर्षांपासून सुरूच होते. निवडणुकीच्या काळातही स्थिती वाईट नव्हती. भाजपामध्ये बंडखोरी होती. काही गठ्ठा मतदार भाजपाच्या विरोधात उभा ठाकू पहात असताना ही स्थिती कॅश करण्यात अविनाश वारजुकर कमी पडले, हे मान्य करावेच लागेल. पक्षाने या मतदारसंघात किती लक्ष घातले, हेसुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची मतदार संघालगतची सभा वगळली तर, कुणीही बडा नेता फिरकला नाही. वारजुकरांच्या एकहाती लढाईला विजय वडेट्टीवारांनी काही प्रमाणात बळ देण्याचा प्रयत्न केला असला तरी, हे प्रयत्न तोकडे पडले. परिणामत: ८७ हजार ३७७ मते मिळवून भाजपाचे कीर्तीकुमार भांगडिया २५ हजार १५५ मताधिक्याने विजयी झाले.
बल्लारपुरात पक्षाने दिलेला उमेदवार नवखा नसला तरी, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मात्र हा चेहरा नवा होता. अन्य नावांची चर्चा सुरू असताना अनपेक्षितपणे घनश्याम मुलचंदानी यांचे नाव आले. ऐनवेळी बॅनर बनविण्यापासून त्यांना जुळवाजुळव करावी लागली. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली असली तरी, लढाई सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराशी होती. मतदार संघातील एकूण चर्चा आणि वातावरण लक्षात घेता, मुलचंदानी चांगली टक्कर देतील, असे वाटले होते. मात्र मुनगंटीवारांचे मताधिक्य तोडता आले नाही.
चंद्रपुरात मात्र काँग्रेसची स्थिती वाईट राहिली. अन्य स्थानिक पर्याय असतानाही महेश मेंढे या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली. भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांशी टक्कर देण्यात ते मागे पडले. स्थानिक पक्षनेत्यांची ताकदही कामी आली नाही. परिणामत: उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला.
विजय वडेट्टीवारांनी मात्र एकहाती लढा दिला. अखेरच्या दिवसांपर्यंत ते मैदानात पाय रोवून होते. स्थानिक पातळीवर पक्षातंर्गत विरोध असतानाही आपले राजकीय कौशल्य वापरत त्यांनी भाजपाचे अतुल देशकर यांचा १३ हजार ६१० मतांनी पराभव केला.
जिल्ह्यात किमान तीन जागा काँग्रेस राखेल, अशी हवा अगदी निवडणुकीच्या तीन दिवसांआधी होती. मात्र फाजील आत्मविश्वासात बुडालेल्या नेत्यांना अखेर मोदी वादळाचा तडाखा बसलाच.

Web Title: The Congress had to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.