काँग्रेसने देशाला मुर्ख बनविण्याचे काम केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:23 PM2019-04-02T22:23:14+5:302019-04-02T22:23:33+5:30
काँग्रेसने या देशाला ५०-६० वर्ष एप्रिल फुल बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरिबी हटली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : काँग्रेसने या देशाला ५०-६० वर्ष एप्रिल फुल बनविण्याचे काम केले. काँग्रेसकडून ते काम आताही सुरूच आहे. पंडित नेहरूंपासून देण्यात येणारा ‘गरिबी हटाव’चा नारा काँग्रेसकडून आजही देणे सुरूच आहे. पण देशातील गरिबी हटली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागभीड येथे केले.
ते नागभीड येथे आयोजित करण्यात आलेल्या गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, गडचिरोली - चिमूर लोकसभेचे उमेदवार अशोक नेते, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार मितेशकुमार भांगडिया, जि.प.उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मते, नागभीडचे नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, कृ.उ.बा.स.सभापती आवेश पठाण, वसंत वारजूकर, न.प.चे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, चिमूर - नागभीडचे भाजप - शिवसेना तालुका अध्यक्ष यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सरकारने गरिबांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना राबविल्या. विविध योजनांचे गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जाऊ लागले आहेत. ९८ टक्के कुटुंबाकडे आता शौचालये झाली आहेत. पाच कोटी कुटुंबांना गॅस दिले आहेत. मुद्रा लोनद्वारे अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.गरिबांना घरे देण्याचे काम मोदी सरकारने केले. दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन या देशात महामार्गांचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी सरकारच्या काळात झाले, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार अशोक नेते, आ.कीर्तीकुमार भांगडिया यांनीही मनोगत व्यक्त केले.