कांँग्रेस पुढार्यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करावे
By admin | Published: May 20, 2014 11:33 PM2014-05-20T23:33:54+5:302014-05-20T23:33:54+5:30
सिंदेवाही तालुक्यात आपल्या राजकीय पक्षाचे संघठन मजबूत व्हावे, कार्यकर्त्याच्या समस्या सुटाव्यात त्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे याकरिता कोणत्याही राजकीय पक्षात प्रयत्न होताना दिसत नाही.
बाबूराव परसावार - सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यात आपल्या राजकीय पक्षाचे संघठन मजबूत व्हावे, कार्यकर्त्याच्या समस्या सुटाव्यात त्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे याकरिता कोणत्याही राजकीय पक्षात प्रयत्न होताना दिसत नाही. उलट एखादा पक्ष मोठा झाला की, त्याला बंडखोरीची लागण लागते. पक्ष वाढला, पक्षातील नेते वाढले की गटबाजीला ऊत येतो. पक्षांतर्गत शहकाटशाहाचे राजकारण खेळल्या जाते आणि मग निवडणुकीत तिकीट मिळाले नाही की, तो बंडखोर होतो. बंडाचा झेंडा हातात घेवून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध रिंगणात उडी घेतो. सिंदेवाही तालुक्यातही हिच स्थिती आहे. चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा निकाल जाहीर झाला. या क्षेत्रातून भाजपाचे अशोक नेते २ लाख ३६ हजार मतांनी विजय झाले. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या तीन तालुक्याचा समावेश आहे. ब्रह्मपुरी विधानसा क्षेत्रातून अशोक नेते यांना ८६ हजार ३५० तर, काँग्रेसचे डॉ. नामेदव उसेंडी यांना ५६ हजार १८३ मते मिळाली. भाजपाचे अशोक नेते यांना ३० हजार १६७ मताची आघाडी मिळाली. सिंदेवाही तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता मात्र राहिलेला नाही. मागील विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरांपेक्षा पक्षांतर्गत घरभेद्यांचा काँग्रेस उमेदवाराला फटका बसला. काँग्रेसच्या गटबाजीचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला व भाजपाचे अतुल देशकर हे २००९ च्या विधानसभेत निवडून आले. काँग्रेस पक्षाचे खासदार व आमदार निवडून आल्यानंतर गटबाजीचे राजकारण सुरू करतात व सर्व सामान्य नागरिकांना विसरून जातात. वाढती महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, सिंचन प्रकल्प, टोल टॅक्स, विकासाची कामे या कारणाने नागरिक त्रस्त झाले होते. त्याचाच परिणाम लोकसभा निवडणूक निकालावरुन दिसून आले. मोदी लाटेमुळे अशोक नेते यांचे मताधिक्य वाढले तर, काँग्रेसचा सफाया झाला. लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या नियोजनाचा अभाव होता. मित्र पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविली. प्रचार कार्यालयात चार-पाच कार्यकर्ते सोडले तर, काँग्रेसचे पदाधिकारी फिरकले नाहीत. राष्ट्रवादी पक्षाला सन्मानाने वागणूक दिली नसल्याचे आता कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात आहे. तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी थोडे अंर्तमुख होवून आत्म परिक्षण करणे महत्त्वाचे आहे.