चंद्रपूरच्या खासदारांचा बंगला चोरट्यांनी फोडला; साहित्याची नासधूस, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 10:19 AM2022-04-28T10:19:48+5:302022-04-28T10:27:41+5:30
सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली.
चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर यांचा सूर्यकिरण नावाचा बंगला चोरट्यांनी फोडल्याची घटना बुधवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आली. चोरट्याच्या हाती काही लागले नसले तरी चोरट्यानी कपाट फोडून साहित्याची नासधूस केली. यातील तीन आरोपींना १२ तासांत रामनगर पोलिसांना अटक करण्यात यश आले असले तरी या घटनेने पुन्हा एकदा चंद्रपुरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रोहित इमलकर (२४), शंकर नेवारे (२०, दोघेही रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (२०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
खासदार बाळू धानोरकर यांचा सरकार नगर येथे सूर्यकिरण नावाचा बंगला आहे. मंगळवारी रात्री ते वरोऱ्याला मुक्कामी होते. त्यांचा सुरक्षारक्षक व त्यांची पत्नी गाठ झोपेत होते. हीच संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंगाल्याच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन त्यांनी सामानाची नासधूस केली, कपाट फोडले. सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली. या घटनेची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलीस यंत्रणा मोठा फौजफाटा खासदारांच्या बंगल्यावर पोहोचला.
बंगल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तीन युवक कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली. १२ तासांच्या आता तिघांनाही जेरबंद केले. खासदारांच्या बंगल्यातून खाली हात परतल्याने या तिघांनी या परिसरातील आणखी दोन घरे फोडली असल्याची माहिती आहे. चक्क खासदारांचे घर सुरक्षित नसल्याने जनसामान्यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.