विकासासाठी काँग्रेस हाच एक पर्याय
By admin | Published: January 9, 2016 01:23 AM2016-01-09T01:23:36+5:302016-01-09T01:23:36+5:30
काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे.
सुभाष धोटे : कोरपना येथे केली विकास कामे
कोरपना : काँग्रेसने गोरगरीब जनतेला प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. पाड्यापासून ते महानगरपर्यंत देशात झालेला विकास हा विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या काँग्रेस पक्षाची देण आहे. त्यामुळे गाव व शहराच्या विकासासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.
कोरपना शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा माजी विधान परिषद उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते श्रीधर गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी अध्यक्ष शेखर धोटे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे, काँग्रेसचे कोरपना तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, राजुरा तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, माजी सभापती हिराताई रणदिवे, माजी उपसभापती रऊफ खान वजीर खान, पंचायत समिती सदस्या हर्षाली गोडे, डॉ. अशोक राजुरकर, सिताराम कोडापे, शेख वहाबभाई, संभाजी कोवे, शाम रणदिवे, अभय मुनोत, पाशा पटेल, दिवाकर बोरडे, हारुण सिद्धीकी आदी मान्यवर उपस्भित होते.
माजी आमदार सुभाष धोटे पुढे म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादीने आजपर्यंत लोकांना फक्त खोटी आश्वासने दिली. काँग्रेसने आश्वासने न देता कामे केली. आमदार असताना आपण २५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी कोरपना शहराला देऊन या तालुका ठिकाण असलेल्या शहराचा विकास केला. कोरपन्यात झालेला विकास मतदार विसरणार नाही, असा विश्वास मतदारांवर दाखवून ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ अशी निती असणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन केले. संचालन युवक काँग्रेस विधानसभा महासचिव सचिन फुलझेले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
भाजपने दिली केवळ पोकळ आश्वासने- पुरके
भाजपाने केवळ पोकळ आश्वासने दिली. मात्र पूर्तता कोणत्याही आश्वासनाची केली नाही, असा आरोप माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी अपल्या भाषणातून केला. ते म्हणाले, हे सरकार निव्वळ घोषणाबाज आहे. याचा अनुभव आता जनतेलाही आला आहे. म्हणूनच स्थानिक निवडणुकांत त्यांची सरशी जागोजागी दिसत आहे. नागरिकांनी योग्य विचार करावा, असे आवाहन त्यांनी सभेत केले.