काँग्रेस कार्यकारिणीवर नाराज गटाची प्रदेशाध्यक्षांकडे धाव
By admin | Published: June 8, 2016 12:49 AM2016-06-08T00:49:48+5:302016-06-08T00:49:48+5:30
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढकारात घोषित झालेली जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी गटबाजीला प्रोत्साहन देणारी असून ...
हे तर गटबाजीला प्रोत्साहन : पुगलिया गटाने पाठविले पत्र
चंद्रपूर : आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढकारात घोषित झालेली जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी गटबाजीला प्रोत्साहन देणारी असून पक्षकार्यकर्त्यांवर अन्याय करणारी असल्याचे सांगत पुगलिया गटाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकाराचा गंभीरपणे विचार करून प्रदेश कार्यकारिणीची सभा बोलवावी आणि पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टीने विचार व्हावा, अशी मागणी पत्रातून केली आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा काँग्रेसची जंबो कार्यकारिणी घोषित झाली. यात अनेकांना डावलल्याची प्रतिक्रिया उमटली होती. यावरून धुसफुस सुरू होती. त्याची परिणती प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठविण्यात आणि पत्रकार परिषदेतून नाराजी प्रगट करण्यात झाली. जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव अॅड. अविनाश ठावरी, काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते सतीश वारजुकर, माजी महापौर सुरेश महाकुलकर, सुनिता लोढीया यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष विजय देवतळे यांच्यावर आरोप करण्यात आले.
ते म्हणाले, मागील निवडणुकीत तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश यांच्या आशिर्वादामुळे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी एकतर्फी राजकारण चालविले होते. त्याचा परिणाम पक्षावर झाला. ही बाब लक्षात आणूनही पक्षातील नेत्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्क्रियतेपणामुळे पक्षाची पिछेहाट झाली.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सुचनेवरून आपण पक्ष बळकट करण्याचे काम सातत्याने केले. असे असतानाही पक्ष बदलणाऱ्या धनाढ्य उमेदवाराला संधी मिळाली. मात्र त्यांनी मिवालेल्या सत्तेचा दुरूपयोग पक्षात गटबाजी पसरविण्यासाठी केला. त्याची दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या मागणीची आणि पत्राची दखल प्रदेशाध्यक्ष घेतील, असा विश्वास यावेळी उपस्थित काँग्रेसजनांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)