कॉग्रेस शहराध्यक्षांनी स्वत:लाच काळे फासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:46 PM2017-09-14T22:46:08+5:302017-09-14T22:46:26+5:30
येथील सहायक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी उईके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील सहायक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी उईके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला आणि स्वत:लाच काळे फासल्याच प्रकार गुरूवारी घडला.
नंदू नागरकर यांनी १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहराज्यमंत्री, मनपा आयुक्त यांना निवेदन देवून नगर काँग्रेस कमिटीची मालमत्ताप्रकरणी बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्टचे अध्यक्ष माजी खा. नरेश पुगलिया, सचिव सी.के. नायर, संचालक मंडळ, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष गजानन गावंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या सर्वांनी संगनमत करून खोटे दस्तावेज, शपथपत्राच्या आधारे ९९ वर्षांची लीज घेत प्रशासनाची दिशाभूल केल्याच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासंदर्भात २९ आॅगस्टला नंदू नागरकर यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांना स्मरण पत्र दिले होते. त्यांनी बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्रस्टवर गुन्हा दाखल करावे व लीज रद्द करावी, असे पत्रात म्हटले होते.
अधिकाºयांनी या प्रकरणावर कार्यवाहीसाठी दस्ताऐवजांची माहिती मागितल्यानंतर भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे २४ जुलैचे आदेश पत्र, त्यासोबतच चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या १३ जुलैच्या ठरावाची प्रत तसेच ३ मे २०१४ रोजीच्या आपल्या नियुक्तीचे पत्र आपण सादर केले होते. तरीही कार्यवाही करण्याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष केले, असे नागरकर यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांना निवेदन देण्याकरिता गेलो असता, ते उडवाउडवीचे उत्तर देत होते. त्यांनी कोणतेही दस्तावेज दाखवण्यास व त्याची माहिती देण्यास नकार दिला आणि काही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे आपण स्वत:लाच काळे फासल्याचे नागरकर यांनी म्हटले आहे. यावेळी माजी प्रदेश सचिव सुनिता लोढिया, अनु. जाती विभागाचे संजय रत्नपारखी, अॅड. मलक शाकीर, असंघटीय कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, मोहन डोंगरे उपस्थित होते.
अन्यथा तीव्र आंदोलन करणार
बल्लारपूर पेपर मिल मजदूर ट्र्स्टचे अध्यक्ष माजी खा. नरेश पुगलिया, सचिव सी.के. नायर, संचालक मंडळ, माजी शहर काँग्रेस अध्यक्ष गजानन गावंडे हे प्रशासनावर दबाव टाकत आहेत. त्यांचावर सोमवारपर्यंत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.