भरपावसात कोल वॉशरीजविरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:06+5:302021-07-09T04:19:06+5:30
घुग्घुस : उसगाव रस्त्यावरील मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली कोलवॉशरी तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. त्या वॉशरीमध्ये चार मोठ्या ...
घुग्घुस : उसगाव रस्त्यावरील मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली कोलवॉशरी तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. त्या वॉशरीमध्ये चार मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना कोळसा वाहतुकीचे काम देण्यात आले. यात दीडशे स्थानिक ट्रकमालकांवर अन्याय होत आहे. त्या ट्रकमालकाला सरळ काम देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी घुग्घुस शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात गुप्ता वॉशरीजच्या मुख्य गेटवर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
येथील महामिनरल माइनिंग अँड बेनिफिकेशन प्रा.लि. उसगाव गुप्ता कोल वॉशरीजचे घुग्घुस युनिट आहे. यात वॉशरीजतर्फे अवनिश लॉजिस्टिक, बालाजी ट्रान्सपोर्ट, पी.टी.सी. ट्रान्सपोर्ट, डी.एन.आर. यांना कोळसा वाहतुकीची कामे देण्यात आली. त्यामुळे सिंगल ट्रक चालक-मालकाचे शोषण करीत असल्याने संतप्त ट्रक चालक-मालकांनी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांचे लक्ष वेधले. यापूर्वीच यासंदर्भात व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेतली नाही. म्हणून गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. घुग्घुस ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मध्यस्थीने बैठक घेण्यात आली. यामध्ये वॉशरीजचे वरिष्ठ अधिकारी सुयोग बिडलावार हे स्थानिक चालक-मालक यांच्या समस्या निकाली काढण्याकरिता ९ जुलैला बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सय्यद अनवर, श्रीनिवास गोस्कुला, अजय उपाध्ये, सिनू गुडला, राकेश खोब्रागडे, रियाज शेख, भास्कर कलवल, श्याम आरकीला, रोहित जैस्वाल, अजिंक्य बहादूरे, अंगद बिराम, मोसीम शेख, बबलू खान, संतोष गुप्ता, विशाल मादर आदी उपस्थित होते.