नगरपंचायतीत ५१ पैकी २७ जागांवर काँग्रेसचा विजय

By Admin | Published: January 12, 2016 12:56 AM2016-01-12T00:56:35+5:302016-01-12T00:56:35+5:30

राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना, जिवती व गोंडपिंपरी या नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली असून ...

Congress victory in 27 seats out of 51 in Nagar Panchayat | नगरपंचायतीत ५१ पैकी २७ जागांवर काँग्रेसचा विजय

नगरपंचायतीत ५१ पैकी २७ जागांवर काँग्रेसचा विजय

googlenewsNext

कोरपना, जिवती, गोंडपिंपरी नगरपंचायत : काँग्रेस पक्षाची सत्ता येणार
गडचांदूर : राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना, जिवती व गोंडपिंपरी या नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली असून तीन पैकी दोन नगर पंचायतीवर काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्त्वात निर्विवाद बहुमत मिळविले.
कोरपना येथील नगर पंचायतीसाठी एकूण १७ उमेदवार निवडून द्यायचे होते. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे यांच्या खांद्यावर येथील काँग्रेसची धुरा होती. या ठिकाणी १७ पैकी १४ जागांवर काँग्रेसने विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडविला. राष्ट्रवादी काँग्रेस एक, शेतकरी संघटना एक व अपक्षाला एक जागा जिंकता आली. काँग्रेसचे आबीद अली यांनी बंडखोरी केल्यामुळे विजय बावणे यांनी सदर निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्त्वात विजय बावणे यांच्या कार्याला श्रीधर गोडे, शेखर धोटे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, शाम रणदिवे, शेख वहाबभाई यांची साथ होती.
जिवती नगर पंचायतीत काँग्रेसला जोरदार मुसंडी मारली आली. तब्बल १० वर्षानंतर येथे काँग्रेसला यश मिळविता आले. माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्त्वात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोदरु पाटील जुमनाके, पंचायत समिती उपसभापती सुग्रीव गोतावळे, निशीकांत सोनकांबळे आदींच्या खांद्यावर काँग्रेसची येथील धुरा होती. या ठिकाणी काँग्रेसने १७ पैकी १० जागांवर विजय मिळविला. जिवती नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चार तर भाजपा तीन जागांवर समाधान मानावे लागले.
गोंडपिंपरी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. येथे अपक्षांनी बाजी मारली. अपक्ष सात, भाजपा सहा व शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. गोंडपिंपरीत देखील सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसने केला आहे. कोरपना, जिवती व गोंडपिंपरी या तिन्ही तालुक्यांचा समावेश राजुरा विधानसभा क्षेत्रात आहे. कोरपना १७, जिवती १७ व गोंडपिंपरी १७ अशा एकूण ५१ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसने २७ जागा जिंकल्याने हा क्षेत्र काँग्रेसचाच गड असल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Congress victory in 27 seats out of 51 in Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.