आर्णीमध्ये काँग्रेस करणार ‘चाय की चर्चा’
By admin | Published: June 12, 2016 12:41 AM2016-06-12T00:41:31+5:302016-06-12T00:41:31+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (तालुका आर्णी) येथे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी....
१६ जूनला आयोजन : मोदींना घेरण्याची तयारी
चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी (तालुका आर्णी) येथे दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (चाय पे चर्चा) हा कार्यक्रम करून शेतकऱ्यांच्या समस्या आणि उन्नतीवर चर्चा घडवून आणली होती. मात्र दोन वर्षात शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीने कसलीही आखणी झाली नाही, उलट आत्महत्या वाढल्या. त्यामुळे पंतप्रधानांच्या आश्वासनांवर उत्तर म्हणून काँग्रेसने ‘चाय की चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
१६ जूनला आर्णी येथील बालाजी जिनींगच्या सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होऊ घातला असून त्यातून पंतप्रधानांना त्यांनी दोन वर्षांपूर्वी तेथील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली जाणर असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेतून दिली.
शिवाजीराव मोघे म्हणाले, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम ठेवला होता. शेतकऱ्यांना दिलेल्या वारेमाप आश्वासनांची भरपूर प्रसिद्धी करून त्यांनी सत्ता मिळविली. ते पंतप्रधानही झाले. मात्र त्याच गावातील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या त्यांना थांबविता आल्या नाहीत. यावरून त्यांच्या आश्वासनातील फोलपणा स्पष्ट होतो. सत्तेत येताच शेतकऱ्यांना ते उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा देणार होते. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. कापसाचा दर फक्त ५० रूपयांनी वाढविण्यात आला. शेतकऱ्यांना अल्पदरात कर्ज देण्याचीही घोषणा होती. मात्र शेतकरी आजही कर्जासाठी बँकाच्या दारात दिसत आहे. स्व.राजीव गांधी यांच्या नावाने असलेल्या जीवनदायी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे.
निवडणुकीसाठी शेकडो सभा घेवून विदर्भवारी करणारे पंतप्रधान आज विदर्भात आणि देशात दुष्काळ असताना एकदाही फिरकलेले नाहीत. यावरून त्यांचा जनतेप्रति असलेला कळवळा दिसतो, अशीही टीका त्यांनी केली. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश आणि आश्वासनातील खोटारडेपणा जनतेसमोर आणण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, राज्यसभा सदस्य राज बब्बर, राष्ट्रीय युवक कांग्रेस अध्यक्ष अमरींद्र सिग राजा ब्रार व प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी खासदार नरेश पुगलिया, पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बढे, यवतमाळ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणिस भरत राठोड, राहुल पुगलिया, गजानन गावंडे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)