काँग्रेसची गरिबी हटाओ घोषणा म्हणजे एप्रिल फुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:10 PM2019-04-08T23:10:29+5:302019-04-08T23:11:00+5:30
कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ गडचांदूर येथील प्रचार सभेत केली.
यावेळी भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर, आमदार अॅड. संजय धोटे, विधान परिषदेचे आमदार अनिल सोले, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, अशोक जिवतोडे, रिपाइं (आ.) चे सिद्धार्थ पथाडे, डॉ. मंगेश गुलवाडे, न. प. उपाध्यक्ष आनंदी मोरे, नितीन पिपरे, सतिश उपलेंचीवार, नारायण हिवरकर, केशव गिरीमाजी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक नवनवीन योजना राबविण्यात आल्या. विविध योजनेचे गरिबांच्या खात्यावर डिबीटीद्वारे थेट पैसे जाऊ लागले. त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसला. प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घर, शौचालये, गॅस आता उपलब्ध होऊ लागले आहे. मुद्रा लोनमुळे बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागला. दळणवळणाचे महत्व लक्षात ठेवून या देशात महामार्गाचे जाळे विणण्याचे एक मोठे काम मोदी यांच्या काळात झाले. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळणार, असा दावाही त्यांनी केला आहे. सभेला राजुरा कोरपना जिवती क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
पेंडाल उडाला
मुख्यमंत्र्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. दरम्यान, आमदार अॅड. संजय धोटे यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळ आले. यात पेंडालचा समोरील भाग उडाला. यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला. मुख्यमंत्र्यांनी यानंतरच्या भाषणात पेंडाल जसा हव्याने उडाला, तसे कॉंग्रेसला पण हवेत उडवा, असा टोमणा लगावला आणि एकच हशा पिकला.
मुख्यमंत्री अडीच तास उशिरा
मुख्यमंत्र्यांची नियोजित सभा दुपारी १ वाजता होती. परंतु मुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिरा पोहचल्याने उपस्थितांना भर उन्हात ताटकळत राहावे लागले.