अधिष्ठात्यांना रायुकाँ पदाधिकाऱ्यांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:01 PM2018-10-26T23:01:18+5:302018-10-26T23:02:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाल मृत्यूच्या घटनात वाढ झाली आहे. दसऱ्यांच्या दिवशी तब्बल सहा बालकांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाल मृत्यूच्या घटनात वाढ झाली आहे. दसऱ्यांच्या दिवशी तब्बल सहा बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ. मोरे यांना घेराव घालून संताप व्यक्त करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. परंतु, येथे कार्यरत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मागील काही वर्षात बाल मृत्यूच्या घटनात वाढ झाली आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी दवाखाने आहेत. या सर्व प्रकारावर अधिष्ठाता डॉ. मोरे यांचे दुर्लक्ष होत आहे. दसऱ्याच्या दिवशी तब्बल सहा बालकांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बालमृत्यूच्या घटनांना जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी रायुकाँच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी नितीन भटारकर यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष सुनील दहेगावकर, माजी उपसरपंच अमोठ ठाकरे, सुनील काळे, निमेश मानकर, पंकज ढेंगरे, महेंद्र लोखंडे, उपरे उपस्थित होते.