समाज समर्पित मुनगंटीवार यांना मताधिक्याने विजयी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:39+5:30

देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या करू लागला. तरूण बेरोजगार झालेत. गावे ओस पडली. आपला देश धनवान झाला आहे, मात्र येथील जनता गरीब राहिली.

Conquer the devoted Mungantiwar by vote | समाज समर्पित मुनगंटीवार यांना मताधिक्याने विजयी करा

समाज समर्पित मुनगंटीवार यांना मताधिक्याने विजयी करा

Next
ठळक मुद्दे नितीन गडकरी : बल्लारपूर येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून प्रदूषणविरहित उत्पादन तयार करता येते. शिवाय त्यातून मोठा रोजगार उभा राहतो. अगरबत्तीच्या काड्या आणि आईसक्रीमचे चमचेही आम्हाला विदेशातून आयात करावे लागतात, हे दुर्दैव आहे. या परिसरात उत्तम बांबू आहे. त्यामुळे येथे ‘बांबू क्लस्टर’ तयार व्हावे. तसेच हा प्रदेश धान उत्पादनातही अग्रेसर असल्याने तणसापासून बायोडिझेलचे शंभर कारखाने उभे व्हावेत. या दोन्ही प्रकल्पासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी मी द्यायला तयार आहे. गडचिरोली-चंद्रपूर हे ‘बायो एव्हिएशन फ्युल’चे हब होऊ शकते. यातून येत्या काळात ३० हजार तरूणांना रोजगार मिळेल, अशी आशा भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तम कार्यकर्ता, नेता आणि कार्यक्षम मंत्री म्हणून जनतेच्या हृदयात विशेष स्थान प्राप्त केले आहे. रचनात्मक वृत्ती ठेवणाऱ्या या समाज समर्पित नेत्याला मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर शहरात आयोजित जाहीर सभेत ना. गडकरी बोलत होते. यावेळी मंचावर उमेदवार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, अ‍ॅड. संजय धोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी आत्महत्या करू लागला. तरूण बेरोजगार झालेत. गावे ओस पडली. आपला देश धनवान झाला आहे, मात्र येथील जनता गरीब राहिली. कारण ६२ वर्षे या देशाला दूरदृष्टी असलेला नेता लाभला नाही, असा आरोपही गडकरी यांनी केला.
काँग्रेसच्या प्रदीर्घ काळात चुकीच्या रूळावर गेलेली देशाची व राज्याची गाडी अवघ्या पाच वर्षात योग्य मार्गावर येणे शक्य नाही. परंतु, आम्ही वेगाने या गाडीला रूळावर आणत आहोत. कापसापासून सुत, सुतापासून तयार कपडे आणि त्यानंतर त्याचे विपणन करण्याची ४० कोटीची योजना असून, त्यात २० कोटी सानुग्रह निधी दिला जाईल. १० कोटी उद्योजकांनी गुंतवायचे आहेत. तर १० कोटींचे कर्ज दिल्या जाणार आहे. अशा पद्धतीचे १३ क्लस्टर मंजूर करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. संचालन समीर केने यांनी केले.
विकासात चंद्रपूर जिल्हा परिपूर्ण करणार - सुधीर मुनगंटीवार
यावेळी बोलताना उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्याात केलेल्या विकासकामांची माहिती जनतेसमोर ठेवली. आजवर चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी कधी नव्हे इतका निधी आपण मंजूर केला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात भरीव असा विकास झाला असून रोजगार व स्वयंरोजगार, कृषी विकास, सिंचन, पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा, महिला व बालविकास, विद्यार्थी विकास असा सर्वस्पर्शी विकास आपण केला आहे. मिशन शक्ती, मिशन शौर्य, मिशन सेवा, मिशन मंथन अशा विविध मिशनच्या माध्यमातून या जिल्हयातील युवकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यास या जिल्हयाला, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Conquer the devoted Mungantiwar by vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.