ताडोबातील जटायूच्या अधिवासाने पर्यावरणाचे संरक्षण - सुधीर मुनगंटीवार

By राजेश मडावी | Published: January 22, 2024 05:55 PM2024-01-22T17:55:56+5:302024-01-22T17:57:12+5:30

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जटायू संवर्धन हा राज्यस्तरीय प्रकल्प महाराष्ट्र वनविभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त सहकार्यातून उभारण्यात आला.

Conservation of environment by Jatayu habitat in Tadoba says Sudhir Mungantiwar | ताडोबातील जटायूच्या अधिवासाने पर्यावरणाचे संरक्षण - सुधीर मुनगंटीवार

ताडोबातील जटायूच्या अधिवासाने पर्यावरणाचे संरक्षण - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भूमीत आता जटायू (गिधाड) पक्षाचेही संवर्धन होणार आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जटायूच्या अधिवासामुळे ताडोबातील निसर्गाची शृंखला पुनर्स्थापित होण्यास मदत होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी (दि. २१) व्यक्त केला. जटायू संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन व कोळसा क्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, उपसंचालक नंदकिशोर काळे, सरपंच माधुरी वेलादे उपस्थित होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जटायू संवर्धन हा राज्यस्तरीय प्रकल्प महाराष्ट्र वनविभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त सहकार्यातून उभारण्यात आला. रामायणात जटायू पक्षाचे महत्त्व आहे. अयोध्येतील प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ताडोबा येथे राज्यातील जटायू संवर्धनाचा महत्त्वाचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. जटायू हा पर्यावरणाचा स्वच्छता दूत आहे, त्यामुळे जटायू संवर्धनाचा संकल्प केला. आज १० जटायू आहेत. त्यांची संख्या २० आणि पुढे ४० करण्यासाठी ज्यांच्या नावातच ‘राम’ आहे, अशा डॉ. रामगावकर यांच्यावर जटायू संवर्धनाची मोठी जबाबदारी असल्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष परदेशी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला तन्मय बिडवई, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे प्रकाश धारणे, डॉ. मंगेश गुलवाडे, अरुण तिखे, विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर उपस्थित होते.

प्रकल्पाला मिळाले हरयाणातून १० जटायू

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या पिंजोर (हरयाणा) येथील गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे १० जटायू पक्षी शासनाची परवानगी घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या प्रिरिलीज अव्हियारीमध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले आहे. साधारणत: तीन महिन्यानंतर त्यांना निसर्ग मुक्त करण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार

वनांसोबत आयुष्याचे एक नाते असते. वनांसाठी मनापासून काम करणाऱ्यांना आता ‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. ताडोबा उत्सवामध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली.

Web Title: Conservation of environment by Jatayu habitat in Tadoba says Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.