अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:26 AM2021-05-16T04:26:49+5:302021-05-16T04:26:49+5:30
दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा होत असते. परंतु, मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने ...
दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा होत असते. परंतु, मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोणत्या पद्धतीने करायचे याबाबतच अद्यापही अस्पष्टता आहे. विद्यार्थ्यांकडे दहावी उत्तीर्ण असल्याचे काहीतरी प्रमाणपत्र असावे, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून सर्व विषयांवर सामाईक परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे. मात्र याबाबत अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
दहावीची परीक्षा रद्द केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून, यावर पर्याय शोधण्यासाठी संबंधित घटकांचे मत जाणून घेण्यात आले. त्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ऑनलाइन सर्वेक्षण करून मते नोंदविण्यात आली होती. आता त्या आधारावर शालेय शिक्षण विभागातर्फे निर्णय घेतला जाणार आहे.
बॉक्स
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने आता अकरावीच्या प्रवेशाकरिता सीईटी परीक्षेची गुणपत्रिका ग्राह्य धरून प्रवेश दिला जाणार असल्याचे विचाराधीन आहे. या प्रक्रियेमधून कला, वाणिज्य, विज्ञान व इतर शाखांकरिता प्रवेश मिळतील. परंतु, तंत्रनिकेतन आणि आयटीआयला या प्रवेश निकषानुसार अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
बॉक्स
सीईटी ‘ऑनलाइन’ झाली तर ग्रामीण भागाचे काय?
सध्या कोविडचा मोठा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता अकरावीच्या प्रवेशाकरिता सीईटी परीक्षा घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. ही परीक्षा ऑनलाइन घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. अनेक ठिकाणी मोबाइलच्या रेंजची अडचण आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोनची कमतरता आहे.
बॉक्स
ऑफलाइन झाली तर कोरोनाचे काय?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र अकरावीच्या प्रवेशाकरिता शाळास्तरावर बहुपर्यायी सामायिक परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे. ही परीक्षा ऑफलाइन घेतली जाणार असल्याचे सूतोवाच शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. पण, कोरोनाची लाट कायम असल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
बॉक्स
अंतर्गत मूल्यमापण कसे होणार
वर्षभरापासून मोजके दिवसच विद्यार्थ्यांना शाळेत जायला मिळाले. त्यामुळे बराच काळ शाळा व शिक्षकांपासून लांब राहून विद्यार्थ्यांनी दुरस्थ शिक्षणाचा आधार घेतला. वर्षभर केलेली परीक्षेची तयारीही परीक्षा रद्द झाल्याने आता व्यर्थ गेली. पण, आता अंतर्गत मूल्यमापन कसे करावे, याबाबत शिक्षकांची परीक्षा सुरू झाली. या मूल्यमापनाबद्दल अद्यापही काही सूचना किंवा मार्गदर्शन आले नसल्याने शाळा आणि शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
बॉक्स
शिक्षक, प्राचार्य काय म्हणतात?
शाळेतर्फे मूल्यमापन झाल्यास शंभर टक्के प्रामाणिक मूल्यमापन होईल याची शाश्वती नाही. परीक्षा झाली नसल्याने मूल्यमापनाला कुठलाच आधार नाही. त्यामुळे शिक्षण मंडळातर्फे सीईटी परीक्षेद्वारे मूल्यमापन करावे, असा विचार होत आहे. मूल्यमापन झाले नसल्याने कोणत्या शाखेत प्रवेश द्यावा, विद्यार्थ्यांची योग्यता काय आहे, हे कळणे कठीण आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा होणे गरजेचे आहे. परंतु, परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या जीविताची संपूर्ण काळजी घेण्यात यावी.
- प्रा. विजय गायकवाड, सावली
------
शाळेचाच विद्यार्थी असेल आणि त्याने कोणत्याही शाखेसाठी प्रवेश मागितला तर त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी शाळेतील शिक्षकांकडून समजून त्याला प्रवेश देता येईल. मात्र बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यास प्रवेश देताना निश्चित अडचण निर्माण होणार आहे. सध्या केंद्रीय परीक्षेबाबत संभ्रम असला तरी शासनाकडून मार्गदर्शक सूचना येतीलच. या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवेश दिला जाईल.
- प्राचार्य, देवीदास चिलबुले, नागभीड
------
दहावीची परीक्षा रद्द झाल्याची घोषणा होताच विद्यार्थी अभ्यासापासून दुरावले आहेत. आता पुन्हा सीईटी घेतली तर विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सीईटी न घेता दुसरा पर्यायी मार्ग शोधावा.
प्राचार्य नरेंद्र बोबडे, चंद्रपूर