सतत स्क्रीनकडे बघताय, डोळे होताहेत आळशी; वेळीच व्हा सावध, घ्या 'ही' काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 03:53 PM2022-06-01T15:53:13+5:302022-06-01T15:55:20+5:30
डोळ्यांच्या तक्रारीमुळे दैनंदिन जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. सतत समोर असणारा मोबाईल, संगणक, लॅपटाॅप आणि टीव्हीमुळे डोळ्यांना ताण येतो. यामुळे वेळीच सावध होऊन डोळ्यांना ताण येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये संगणक, मोबाईल, लॅपटाॅप, टीव्हीचा वापर अधिक वाढला. सतत स्क्रिनकडे पाहण्याचे दुष्परिणाम आता दिसून येत आहेत. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांना डोळ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी उद्भवत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
डोळ्यांच्या तक्रारीमुळे दैनंदिन जीवनावर त्याचा विपरित परिणाम होतो. सतत समोर असणारा मोबाईल, संगणक, लॅपटाॅप आणि टीव्हीमुळे डोळ्यांना ताण येतो. यामुळे वेळीच सावध होऊन डोळ्यांना ताण येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.
काय काळजी घ्यावी
- संगणक, मोबाईल, टीव्हीकडे एकटक पाहू नये, कमी वापर करावा.
- आहारात फॅटी ॲसिडचा समावेश वाढवा.
- ठराविक वेळाने डोळे स्क्रिनपासून बाजूला न्या. २० ते ३० सेकंदासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
- डोळ्यातील ओलेपणा टिकून ठेवण्यासाठी दर ठराविक वेळाने डोळे पाण्याने धुवा.
- उन्हात बाहेर जाणार असाल तेव्हा आवर्जून सनग्लासचा वापर करा.
संगणकावर काम करताना काही वेळाने दूरवर बघण्याचा प्रयत्न करा.
डोळ्यांवर ताण का येतो ?
- संगणक, मोबाईल, टीव्हीकडे सतत पाहत राहणे.
- कमी प्रकाशात काम करणे.
- एकटक पाहून करावी लागणारी कामे यामुळे डोळ्यांच्या अडचणी उद्भवतात.
- दीर्घकाळ एसीमध्ये बसून काम केल्याने डोळ्यातील ओलावा कमी होतो.
वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी, हार्मोनचे बिघडलेले संतुलन, डोळ्यावर ताण येण्यास कारणीभूत ठरते.
डोळ्यांची उघडझाप न करता सतत स्क्रिनकडे पाहत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण सतत स्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळे आळशी होण्याचा धोका होताे. डोळे चुरचुरणे, लाल होणे, कोरडे पडणे, डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ही लक्षणे दिसली तर घ्या डाॅक्टरांचा सल्ला
- डोळे चुरचुरणे
- लाल होणे
- कोरडे पडणे
डोळ्यातून पाणी येणे.
सतत स्क्रिनकडे बघितल्याने डोळ्यांचा आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी ठराविक वेळानंतर डोळ्यांना स्क्रिनपासून दूर ठेवा. थोड्या-थोड्यावेळाने उघडझाप करा. डोळ्यातून पाणी येत असेल, कोरडे पडले असेल, चुरचुरत असेल तर त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
-डाॅ.सदानंद मोहीतकर, नेत्ररोगतज्ज्ञ, चंद्रपूर