संविधानाने प्रत्येकाला प्रगट होण्याचा अधिकार दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:21 PM2019-03-18T23:21:46+5:302019-03-18T23:22:14+5:30
भारतीय संविधानाने एकाधिकारशाही असलेल्या भांडवलशाहीचा प्रखर विरोध करून समाजवादी लोकशाहीचा पुरस्कार केला. प्रत्येक नागरिकाला प्रगट होण्याचा नैतिक अधिकार दिला आहे, असे विचार संमेलनाध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : भारतीय संविधानाने एकाधिकारशाही असलेल्या भांडवलशाहीचा प्रखर विरोध करून समाजवादी लोकशाहीचा पुरस्कार केला. प्रत्येक नागरिकाला प्रगट होण्याचा नैतिक अधिकार दिला आहे, असे विचार संमेलनाध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
चिमूर क्रांतीभूमीतील दोन दिवसीय पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने पहिले दोन दिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन चिमूर येथील शेतकरी भवनाच्या परिसरात तुकडोजी महाराज साहित्यनगरीत आयोजित करण्यात आले होते. रविवारी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी संघरामगीरीचे संघनायक भदन्त ज्ञानज्योती, डॉ. इंद्रजित ओरके, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे सरचिटनीस सुजितकुमार मुरमाळे, कार्याध्यक्ष डॉ रविंद्र तिरपुडे, स्वागताध्यक्ष अॅड भुपेश पाटील, सहस्वागताध्यक्ष सुरेश डांगे उपस्थित होते.या साहित्य संमेलनात राज्यातील ५०० च्या वर साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक, आदींनी हजेरी लावली होती. आंबेडकरवादी साहित्याने भारतीय साहित्याला दिलेले भरीव योगदान, ओबीसीच्या विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, स्त्रियाचे साहित्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकराची चळवळ, राष्ट्रसंताच्या क्रांतीभूमीतील आंबेडकरी चळवळ- काल, आज उद्या या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. शुद्धोधन कांबळे, प्रा. राजेश ढवळे, डॉ सरिता जांभूळे, धनराज गेडाम उपस्थित होते. विषयाला अनुसरून डॉ. रवींद्र तिरपुडे, डॉ. धनराज खानोरकर, डॉ हेमचंद दुधगवळी, डॉ. महेश मोरे, रवींद्र उरकुडे, डॉ. विणा राऊत, डॉ सुनंदा रामटेके, डॉ विशाखा कांबळे, डॉ. प्रशांत धनविजय, शारदा गेडाम, सुजाता दरेकर भानुदास पोपटे, रामदास कामडी, अॅड शनैशचंद्र श्रीरामे, हरी मेश्राम, किशोर अंबादे यांनी यथोचित मार्गदर्शन केले. डॉ. सरीता जांभूळे यांच्या पाच पुस्तकाचे प्रकाशन परिसंवादादरम्यान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिनीधी व निमंत्रितच्या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी प्रल्हाद बोरकर, आचार्य ना. गो. थुटे तर प्रमुख अतिथी सदानंद लोखंडे, भानुदास पोपटे होते. कार्यक्रमाचे संचालन विनोद गेडाम आभार सुरेश डांगे यांनी केले.
चिमूर जिल्ह्यासह विविध ठराव पारित
चिमूरकराच्या भावनेशी जुळलेली चिमूर क्रांती जिल्याची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी खितपत पडली आहे. या मागणीला हात घालत संमेलनात चिमूर क्रांती जिल्हा करण्यात यावा, हा ठराव पारित करण्यात आला आहे. यासह आंबेडकरवादी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करन्यात यावी, कवी व लेखकाला मासिक वेतन व घर मिळावे, संमेलनासाठी सरकारने निधी द्यावा, प्रकाशकांना पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान द्यावे, संविधानाच्या अनुरूप ग्रामगीतेचा अभ्यासक्रम केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात घेण्यात यावा, आंबेडकर साहित्याचा प्रत्येक विद्यापीठात समावेश असावा, पाली भाषा ही आठव्या सूचीत सामाविष्ट करण्यात यावी, सविधान जाळणाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी, अॅक्ट्रासीटी कायद्याची कडक अमलबजावणी करण्यात यावी, महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यात यावी आदी ठराव पारित करण्यात आले.
कवितेतून विविध विषयांवर चिंतन
साहित्य संमेलनातील कवी संमेलनात काव्यकारांनी आंबेडकरी चळवळ, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, व्यसनमुक्ती, दारूबंदी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्ट्राचार, वाढती महागाई, बेरोजगारी, स्त्री मुक्ती, समता स्वातंत्र्य, बंधुता, काल आज आणि उद्या आदी अनेक विषयावर कवितांचे वाचन केले व त्यावर चिंतन करण्यात आले.