'संविधान उद्देशिका' आता आदिम माडिया भाषेतही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 10:36 AM2023-04-10T10:36:34+5:302023-04-10T10:38:38+5:30
नक्षल प्रभावित दुर्गम भागात संविधान जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
चंद्रपूर : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सीमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. मागील वर्षी पाथ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ९४ टक्के माडिया समाज बांधवांनी ‘संविधान’ हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ही बाब लक्षात घेता भारतीय संविधान उद्देशिकेचा स्थानिक आदिम माडिया भाषेत भामरागड येथील माडिया समाजातील पहिले वकील ॲड. लालसू नोगोटी, हेमलकसा येथील चिन्ना महाका व चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी अनुवाद केला आहे.
देशात एकूण ७५ आदिम समुदाय आहेत. त्यात महाराष्ट्रात कोलाम, कातकरी आणि माडिया या तीन आदिम जमाती आहेत. राज्यातील एकूण तीन आदिम समुदायांपैकी जल, जंगल, जमिनीवर उपजीविका करणारा हा एक समुदाय. शिक्षणाची कमी, जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक या समाजात दिसतो. स्वतंत्र बोलीभाषा व संस्कृती या समुदायाची ओळख. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही मूलभूत गरजांचीच पूर्तता अद्याप या परिसरात होऊ शकलेली नाही. हक्क आणि अधिकाराची होणारी गळचेपी या समुदायासाठी नित्याचीच बाब झाली आहे. अशा या भागात भारतीय संविधान त्यांच्याच बोलीभाषेत पोहोचणे गरजेचे आहे.
संविधान उद्देशिका म्हणजे संविधानाच्या प्रतीचा सार आहे. त्यामुळे या उद्देशिकेच्या माध्यमातून नक्षल प्रभावित भागात संविधानाबाबत जनजागृती करण्याचा एक सकारात्मक अन् प्रामाणिक प्रयत्न केला जातो आहे. माडिया समाजामध्ये या संविधान उद्देशिकेच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती निर्माण झाल्यास कालांतराने हक्काबाबत, देशाचे संविधान अवलंबविण्याबाबत आमूलाग्र बदल होईल.
संविधान तळागाळात-घराघरांत पोहोचवणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. संविधानाचे पाईक म्हणून या भागात संविधान जनजागृतीचे प्रयत्न गरजेचे आहे. माडिया समाजाला आपल्या मातृभाषेत उद्देशिका कळावी अन् त्यातून जनजागृती करता यावी म्हणून आम्ही हा अनुवाद केला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. लालसू नोगोटी, चिन्ना महाका, अविनाश पोईनकर यांनी सांगितले.
अनुवादाबाबत प्रशासन अनभिज्ञ
संविधान म्हणजे काय, हे समजावून सांगण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या दुर्गम भागामध्ये प्रशासन गेली अनेक दशके प्रयत्न करीत असले तरी आदिम माडिया भाषेतून ते नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. संविधान उद्देशिकेचा आजवर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. मात्र, आदिम अन् त्यातल्या त्यात नक्षल प्रभावित भागातील या माडिया भाषेत संविधान उद्देशिकेचा अनुवाद पहिल्यांदाच झाला असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासन या अनुवादाबाबत सध्या अनभिज्ञ असले तरी या राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन या दुर्गम परिसरात शाळा, महाविद्यालय, शासकीय-निमशासकीय कार्यालयातून माडिया भाषेतील संविधान उद्देशिका पोहोचवून जनजागर करणे आवश्यक आहे.