शहिदांच्या मानवंदनेसाठी होणार चिमूर जिल्ह्याची निर्मिती

By Admin | Published: July 23, 2016 01:45 AM2016-07-23T01:45:10+5:302016-07-23T01:45:10+5:30

देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरूद्ध ‘चले जाव’ आंदोलन करून १६ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरूद्ध मोठे आव्हान उभे करण्यात आले.

Construction of Chimur district will be organized for the tribute of martyrs | शहिदांच्या मानवंदनेसाठी होणार चिमूर जिल्ह्याची निर्मिती

शहिदांच्या मानवंदनेसाठी होणार चिमूर जिल्ह्याची निर्मिती

googlenewsNext

जिल्ह्याची मागणी ३६ वर्षे जुनी : सरकारच्या धोरणाने चिमूरकरांच्या आशा पल्लवित
राजकुमार चुनारकर चिमूर
देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरूद्ध ‘चले जाव’ आंदोलन करून १६ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरूद्ध मोठे आव्हान उभे करण्यात आले. या आंदोलनात अनेक क्रांतिकारक, महिला शहीद झाल्या. या आंदोलनांमुळे चिमूर शहर तीन दिवस स्वतंत्र होते. या स्वातंत्र्याच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ चिमूर शहरातून रोवली गेली. त्यानंतर देशभरात आंदोलन होऊन भारत स्वतंत्र झाला. चिमूरकरांच्या क्रांतिकारी कामगिरीची दखल घेऊन चिमूरला क्रांती जिल्हा घोषित करावा, ही मागणी ३६ वर्षे जुनी आहे. शासनाच्या नविन जिल्हे निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला असून जिल्हा निर्मितीला मतदार संघाच्या निकषात चिमूर शहर बसत असल्याने व स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी विचारात घेऊन चिमूरला जिल्हा घोषित करून शहिदांना मानवंदना देणार काय? तसेच शासनाच्या जिल्हा निर्मितीसाठी मतदारसंघाचा निकष ठेवल्याने चिमूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
देशात इंग्रज राजवट असताना इंग्रजाविरूद्धचे पहिले आंदोलन चिमूर शहरात १६ आॅगस्ट १९४२ रोजी झाले होते. त्याद्वारे देशात स्वातंत्र्य लढ्याची ‘मुहूर्तमेढ’ चिमुरातून रोवल्या गेली. त्यासाठी अनेकांनी आपली प्राणाची आहुती दिली. तसेच इंग्रज राजवटीत चिमूर जिल्हा असल्याचे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक दाखले देत आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर चिमूर जिल्ह्याचा दर्जा काढण्यात आला. यापूर्वी चिमूरला जिल्ह्याचा दर्जा असल्याने शासनाचे लोकसभा क्षेत्रसुद्धा चिमूरच्या नावावर होते. याचाच अर्थ चिमूर हे जिल्ह्याचे ठिकाण होते, हे यावरून सिद्ध होते. कारण आजही प्रत्येक जिल्हा स्थळ हे लोकसभेचा मतदारसंघ आहे.
स्वतंत्र भारतात चिमूरला जिल्हा न दिल्याने चिमूर जिल्हा घोषित करावा, यासाठी ३६ वर्षांपासून शासन दरबारी नागरिक निवेदन, आंदोलन करीत आहेत. आजही जिल्ह्यासाठी काहीही करण्याची तयारी चिमूरकर करीत आहेत.
चिमूर जिल्हा निर्मितीसाठी १९८० पासून धरणे, आंदोलन, मोर्चे, उपोषण करत अनेकदा शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आली आहेत. मात्र राजकीय पुढाऱ्यांनी आज करू, उद्या करू, असे आश्वासनेच दिली आहेत.
चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीचा प्रश्न चिमूर व तालुक्यातील नागरिकांसाटी भावनिक प्रश्न असल्याने या मागणीकरिता सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन ५ जानेवारी २००० रोजी करण्यात आले होते. त्यामध्ये हजारो नागरिकांच्या जमावाने तहसील कार्यालयाची राख रांगोळी केली होती. या आंदोलनामध्ये अनेकांना तुरुंगामध्ये डांबण्यात आले होते. असा हा आंदोलनाचा क्रम आजही सुरूच आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हा निर्मितीसाठी मोर्चा काढण्यात आला. प्रशासकीय भवनावर ‘चिमूर क्रांती जिल्हा’ असा प्रतिकात्मक फलक लावला गेला. या दरम्यान तोडफोड झाली. त्यामध्ये गजानन बुटकेसह अनेकांना जेलमध्ये जावे लागले.
चिमूर जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षिय कृती समिती कार्यरत आहे. या समितीकडून प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात येत आहे. या समितीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांसह सर्वच राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग असतो. या समितीचे कार्य नरेंद्र बडे (राजूरकर) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. चिमूरकरांनी जिल्ह्याच्या मागणीसाठी अनेक राजकीय पुढाऱ्याच्या सभा उधळल्या आहेत.
भाजपाच्या विदर्भ वेगळा करण्यासाठी असलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे व राज्यात २२ जिल्हे निर्मितीबाबत शासन स्तरावर सुरू असलेल्या हालचालीमुळे नुकत्याच शासनाने जिल्हा निर्मितीसाठी मतदार संघाना निकष लावल्याने चिमूर हे लोकसभा मतदार संघासह विधानसभा क्षेत्रही आहे. तर भाजपाची देशात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने व चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया हे भाजपाचे असल्याने चिमूरचा जिल्हा प्रश्न सभागृहात मांडून नक्कीच जिल्हा निर्मिती करून शहिदांना मानवंदना देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी शासन शहिदांना मानवंदना देणार असल्याचे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांकडून बोलल्या जात आहे.

Web Title: Construction of Chimur district will be organized for the tribute of martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.