तहसील कार्यालयासमोरील नालीचे बांधकाम रेंगाळले
By admin | Published: June 14, 2014 11:28 PM2014-06-14T23:28:36+5:302014-06-14T23:28:36+5:30
स्थानिक अभ्यंकर प्रभागातील रेल्वे स्टेशन मार्गाच्या कडेला असलेल्या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सुरु केले. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या अर्धवट कामामुळे
वरोरा : स्थानिक अभ्यंकर प्रभागातील रेल्वे स्टेशन मार्गाच्या कडेला असलेल्या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सुरु केले. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या अर्धवट कामामुळे पावसाळ्यातील पाणी व नालीतील सांडपाणी नजिकच्या घरात शिरण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने या प्रभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रेल्वे स्टेशन मार्गालगतच्या बशिर आॅईल मिल ते स्टेट बँकपर्यंत वरोरा शहरातील सर्वात जुनी नाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. दरवर्षी पावसाळ्यात या नालीतील पाणी तुंबून राहते. परिणामी नालीतील घाण पाणी थोपून परिसरातील घरात दोन ते तीन फुटापर्यंत शिरत असल्याने या परिसरातील नागरिकांच्या घरातील वस्तू मोठ्या प्रमाणात निकामी होतात. त्यामुळे या नालीचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर नालीचे बांधकाम स्टेट बँकेपासून सुरू करण्यात आले. या नालीवर अतिक्रमण आहे. नालीचे बांधकाम पुढे जात असताना काहींनी अतिक्रमण काढण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे बांधकाम पुढे नेण्यास अडथळे निर्माण होवून काही दिवसांपासून बांधकाम बंद झाले आहे.
सध्या कुठल्याही क्षणी पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यातच एखाद्यावेळी मुसळधार पाऊस आल्यास या नालीतील पाणी घरात जावून पुन्हा साहित्याची नासधूस होणार, या कल्पनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नालीतील घाण पाण्याचा सर्वाधिक धोका अंबादेवी वॉर्डात राहणाऱ्या नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पालिका प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणून दिली. मात्र अद्यापही नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याच प्रभागाचे नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती छोटु शेख यांच्याशी संपर्क साधला असता, बांधकामामध्ये काही अडचणी आल्या होत्या, याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अडचणी दूर झाल्या. आता लवकरच उर्वरित नालीच्या बांधकामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती त्यांंनी दिली. (तालुका प्रतिनिधी)