रस्ते, नाल्यांचे बांधकाम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:51+5:302021-03-07T04:25:51+5:30

पोलीस स्टेशनमध्ये भंगार वाहने चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. ...

Construction of roads and nallas is incomplete | रस्ते, नाल्यांचे बांधकाम अपूर्ण

रस्ते, नाल्यांचे बांधकाम अपूर्ण

Next

पोलीस स्टेशनमध्ये भंगार वाहने

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र वाहनमालकांनी ही वाहने अनेक वर्षांपासून नेलीच नाहीत. आता ती पोलीस ठाण्यात पडून आहे. त्यातील अनेक वाहने भंगार झाली असून काहींचे सुटे भागही बेपत्ता झाले आहेत. या वाहनांचा लिलाव करण्याची मागणी केली जात आहे.

योजनांचा सामान्यांना लाभ द्यावा

चंद्रपूर : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नोकरी मिळत नसल्याने नैराश्य

चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रकल्पग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत त्यांना नोकरी देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विविध कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वेकोलि, सिमेंट कंपन्या तसेच वीज मंडळामध्येही मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहे.

शिव भोजन केंद्र सुरू करण्याची मागणी

कोरपना : राज्य सरकारने राज्यभरात शिव भोजन केंद्र सुरू केले आहे. मात्र कोरपना तालुकास्तरावर अद्यापही शिव भोजन केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे येथे सदर सुरू करण्यात यावे अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

महागाईमुळे सामान्य ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : मागील काही महिन्यामध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक हैरान झाले आहे. त्यातच महागाईमुळे जगण्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. मात्र उद्योग परिसरातील गावांचा आजही पाहिजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे या उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. तर मूल, सावली, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यात अद्यापही पाहिजे तसे उद्योगच नसल्याने येथे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

स्वच्छता करण्याची मागणी

गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. काही नागरिकामुळे या योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शौचालयांचा वापर सरपण ठेवण्यासाठी

जिवती : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवत असल्याचा प्रकार बघायला मिळत आहे. त्यामुळे गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून अधिकाधिक जनजागृती करणे गरजेचे आहे.

सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षित

जिवती : आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याच्या सिमेला लागून असलेल्या गावांच्या विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

चंद्रपूर : शहरातील विविध वाॅर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मनपाने स्वच्छतेसोबतच फवारणीचा वेग वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संस्थांना काम देण्याची मागणी

चंद्रपूर : बेरोजगार युवकांनी हाताला काम मिळावे म्हणून बेरोजगार संस्था स्थापन करून त्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या संस्थांना शासकीय पातळीवर कामच मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटात या संस्थांना काम देऊन दिलासा देण्याची मागणी संस्थांचे पदाधिकारी तसेच सदस्यांनी केली आहे.

Web Title: Construction of roads and nallas is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.