बांधकाम कामगारांना मिळणार हक्काची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:00 PM2018-12-24T23:00:33+5:302018-12-24T23:01:15+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्याची घोषणा केली आहे. लोकांना आपल्या मेहनतीने हक्काची घरे बांधून देणारे बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रधानमंत्री योजनेतून मिळणारी अडीच लाखांचे अनुदान व राज्य शासनाच्या योजनेतून बांधकाम कर्मचाऱ्यांना हक्काच्या घरासाठी दोन लाखांचा निधी देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचे स्वत:च्या हक्काचे घर साकार करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्याची घोषणा केली आहे. लोकांना आपल्या मेहनतीने हक्काची घरे बांधून देणारे बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रधानमंत्री योजनेतून मिळणारी अडीच लाखांचे अनुदान व राज्य शासनाच्या योजनेतून बांधकाम कर्मचाऱ्यांना हक्काच्या घरासाठी दोन लाखांचा निधी देण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांचे स्वत:च्या हक्काचे घर साकार करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या बांधकाम कामगारांचा मेळाव्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, स्वागताध्यक्ष कामगार उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव, आमदार नाना श्यामकुळे, आमदार अॅड. संजय धोटे, कामगार आयुक्त राजीव जाधव, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, कामगार मंडळाचे सचिव चू. श्रीरंगम, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार, मंडळाचे सदस्य श्रीपाद कुटासकर, अशोक घुवाड, शशांक साठे, सभापती राहुल पावडे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार उपस्थित होते.
‘सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा’ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या २८ विविध कल्याणकारी योजनांचे साहित्य, धनादेश व जीवनावश्यक वस्तूंचे यावेळी कामगारांना वाटप करण्यात आले. ना. मुनगंटीवार म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्रामध्ये नोंदणी सुरू आहे. ८५ रूपये भरून नोंदणी केल्यानंतर कामगारांच्या खात्यामध्ये पाच हजार रूपये जमा करणारे हे सरकार राष्ट्रभक्त कामगारांच्या आरोग्याचीही महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून काळजी घेणार आहे. कामगारांची नोंदणी करताना कुणीही सहकारी नोंदणीपासून वंचित राहू नये, याची काळजी उपस्थित कामगारांनी घ्यावी, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी केले.
कामगाराचा मुलगा कामगार होऊ नये -निलंगेकर पाटील
स्वागताध्यक्ष ना. निलंगेकर पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बांधकाम कामगाराचा मुलगा यापुढे बांधकाम कामगार होता कामा नये, यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. अपघातग्रस्त कामगारांनाही मदतीचा हात दिला जाणार आहे. कामगार नोंदणी योजनेसाठी वित्त, नियोजन व वनमंत्री मुनगंटीवार यांनी केलेल्या मदतीचा ना. पाटील आवर्जून उल्लेख केला.
'हॅलो कामगार ' हेल्पलाईन सुरू होणार
चंद्रपूर जिल्हा मागे राहणार नाही. २०२२ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील हजारो कामगारांना स्वत:च्या हक्काचे घर मिळतील. बांधकाम कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी जिल्ह्यामध्ये स्थायी स्वरूपाची योजना तयार करण्यात येईल. बांधकाम कामगारांच्या सर्व समस्यांची सोडवणुकीसाठी 'हॅलो कामगार' ही पालकमंत्री कामगार हेल्पलाइन सुरू करण्यात येईल. एका फोनच्या माध्यमातून कामगारांच्या समस्यांची सोडवणूक होईल. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार उभे राहतात, त्यांना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण देण्यासाठी ‘वेटिंग शेड’ उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.