केबल संचालकांकडून ग्राहकांची फसवणूक
By admin | Published: April 22, 2017 01:09 AM2017-04-22T01:09:07+5:302017-04-22T01:09:07+5:30
खासगी केबल संचालक दरवर्षी विविध कारणे समोर दरवाढ करीत असतात. वाढीव पैसे न दिल्यास कनेक्शन कापण्याची धमकीही देतात.
मनमानी दरवाढ : अभाआविपचे पंतप्रधानांना निवेदन
चंद्रपूर : खासगी केबल संचालक दरवर्षी विविध कारणे समोर दरवाढ करीत असतात. वाढीव पैसे न दिल्यास कनेक्शन कापण्याची धमकीही देतात. याकडे संबंधीत विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे. या संदर्भातील निवेदन पंतप्रधानांना देण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
संपूर्ण देशातील टीव्ही, एलसीडी आणि एलईडीला सेटअप बॉक्स बसविण्यात आले. मात्र, ग्राहकांना त्याचे बिल देण्यात आले नाही. पे चॅनेल, नि:शुल्क चॅनल किती याची माहितीही ग्राहकांना दिली जात नाही. केबल कनेक्शन व्यावसायिकांचा व्यवसाय रजिस्टर्ड नंबर नसलेल्या अनाधिकृत कार्डद्वारे मनमर्जीप्रमाणे दर महिन्यात वसुली केली जाते.
नेहमी वेगवेगळी कारणे सांगून वाढीव दराची आकारणी केली जाते. पैसे न दिल्यास केबल कनेक्शन बंद करण्याची धमकीही दिली जाते. त्यानंतर पूर्ववत कनेक्शन सुरु करण्यासाठी वाढीव पैसेही मागितले जाते, असा आरोपही संघटनेने केला आहे. मनोरंजन मानवी जीवनाचा एक भाग आहे. मात्र, त्याचा गैरफायदा केबल संचालक घेत आहेत. जादा पैसे ग्राहकांकडून आकारुन त्यांची फसवणूक करीत आहेत. हा प्रकार थांबला पाहिजे, अशी मागणीही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे केशव तिराणीक यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान मोदी यांनाही पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)