कोरोना प्रतिबंधाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केवळ १६.२८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:20+5:302021-02-25T04:35:20+5:30
चंद्रपूर : शासनाच्या निर्देशानुसार, कोरोना प्रतिबंधासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग २० टक्क्यांपेक्षा जास्त असावा लागतो. मात्र, जिल्ह्यात मंगळवार(दि. २३) पर्यंत कॉन्टॅक्ट ...
चंद्रपूर : शासनाच्या निर्देशानुसार, कोरोना प्रतिबंधासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग २० टक्क्यांपेक्षा जास्त असावा लागतो. मात्र, जिल्ह्यात मंगळवार(दि. २३) पर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दर केवळ १६.२८ टक्के आहे. एक लाख ५३ हजार ९४ हजार व्यक्ती अतिजोखमी (हाय रिस्क)च्या संपर्कात असल्याची नोंद झाली. त्यामुळे बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या अधिकाधिक चाचण्या करण्यासाठी प्रशासनाला जलद गतीने पाऊल उचलावे लागणार आहे. अन्यथा, संसर्ग वाढून बाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडण्याचा धोका आहे.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील सर्वांची चाचणी करून कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या प्रक्रियेला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असे म्हटले जाते. २३ फेबुवारीपर्यंत ग्रामीण व शहरी भागात १३ हजार ९६५ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात ८ हजार ७३५ असे एकूण २२ हजार ७०० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहर, ग्रामीण व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ५३ हजार ९४ व्यक्ती अति जोखमीच्या, तर कमी जोखमीच्या संपर्कात दोन लाख १६ हजार ४६५ असे एकूण ३ लाख ६९ हजार ५५९ व्यक्तींची नोंद करण्यात आली. या दोनही गटांतील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर १६. २८ टक्के आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाला तातडीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावा लागणार आहे.
केस १
अमरावती शहरातील नातेवाइकांशी संपर्कात आल्याने बाधित झालो. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने माझ्या कुटुंबातील चौघांची अॅन्टीजेन चाचणी केली. परंतु, सर्वजण निगेटिव्ह आले. काही मित्र संपर्कात आले होते. त्यांचीही चाचणी व्हायला पाहिजे.
केस २
मी हाय रिस्क गटात येतो. मुलांनी खबरदारी म्हणून लगेच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. पॉझिटिव्ह आल्याने गृहविलगीकरणात आहे. कुठून बाधा झाली, याची माहिती नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाल्यास बाधित आढळतील.
केस ३
जे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनीच चाचणी केली. संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेऊन आरोग्य विभागाने कोविड १९ चाचणी केली नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.