राईस मिलमधील दूषित पाणी थेट संरक्षित जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:10 PM2024-08-13T13:10:06+5:302024-08-13T13:13:54+5:30
Chandrapur : वन्यप्राण्यांच्या जीवितासह अधिवासालाही धोक्याची शक्यता
दत्तात्रय दलाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : संरक्षित जंगल, जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास व वन्यप्राण्यांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, या विपरीत चक्क राईस मिलमधील केमिकलयुक्त पाणी थेट संरक्षित जंगलात, वन्यप्राण्यांच्या अधिवासात सोडत असल्याचा प्रकार ब्रह्मपुरी वनविभागात कक्ष क्र. ८४१ मध्ये सुरू आहे.
या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांसह जंगलालाही धोका निर्माण होत आहे. याकडे ब्रहापुरी वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून उचित कारवाई होणार काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रह्मपुरी-नागभीड मुख्य महामार्गालगत डाव्या बाजूला असलेल्या एका राईस मिलधारकाकडून चक्क रस्त्याच्या खालून भूमिगत पाइप टाकून मिलमधील केमिकलयुक्त पाणी रस्त्याच्या उजव्या बाजूला सायगाटा संरक्षित जंगल गट क्र. ८४१ मध्ये सोडण्यात येत आहे. सायगाटामधून पुढे लाखापूर जंगल परिसरात हे दूषित पाणी पोहोचते. या जंगलात वाघ, बिबट यांच्यासह अस्वल, हरीण, रानगवा, चितळ, मोर तथा अनेक वन्यप्राण्यांचा मोठा अधिवास आहे. सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास केव्हाही धोका निर्माण होऊ शकतो. तर त्यांचा अधिवासही धोक्यात आलेला आहे. राखीव किंवा संरक्षित जंगलात सामान्य नागरिकांना प्रवेश करता येत नाही. असे आढळून आल्यास त्यांच्यावर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येते. वन्यजीवांची शिकार झाल्यास कठोर शिक्षेचे प्रावधान आहे; मात्र या सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास व अधिवासाला धोका होण्याची शक्यता आहे.
प्रजननासाठी अनुकूल जंगल
ब्रह्मपुरी वनविभाग उत्तर-दक्षिण असा ३० हजार हेक्टरमध्ये विस्तीर्ण पसरला आहे. येथील जैवविविधता पोषक असल्याने वाघांसह अनेक वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आढळून येतो. वाघ व बिबट यांच्या प्रजननाकरिता उत्कृष्ट जंगल असल्याने वाघ व बिबट (मादी) यांच्यासह अनेक वन्यप्राणी जंगलात बछड्यांना जन्म देतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या घनदाट जंगलाला संरक्षित घोषित करण्यात येते.
"आर.एफ.ओ. यांना या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी पाठवितो. मिलचे केमिकलयुक्त पाणी जंगलात सोडण्यात येत असेल तर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येईल."
- दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी
"नगाभीड महामार्गावरील राईस मिलमधून मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी संरक्षित जंगलात सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे वन्यप्राणी व वृक्षांना धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांच्याकडे मी कारवाईची मागणी करणार आहे."
- विवेक करंबेळकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर