चिमूर शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:48+5:302021-03-04T04:53:48+5:30
फोटो : नळाद्वारे येणारे दूषित पाणी. चिमूर : चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा ...
फोटो
: नळाद्वारे येणारे दूषित पाणी.
चिमूर : चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागांत नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने गांधी वॉर्ड, ठक्कर वॉर्ड, चावडी मोहल्ला, वडाळा परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
१५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या चिमूर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येताे. नगर परिषदेद्वारे उमा नदीजवळील फिल्टर प्लांटमधून सार्वजनिक व घरगुती नळाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र मागील काही दिवसांपासून शहरातील गांधी वॉर्ड, ठक्कर वॉर्ड, चावडी मोहल्ला, आझाद वॉर्ड व वडाळा परिसरातील नळाला दूषित पाणीपुरवठा होत आहे, तर काही नागरिकांनी अनेक महिन्यांपासून टाकी साफ केली नसल्याचाही आरोप करीत साधे ब्लिचिंग पावडरही टाकत नसल्याचा आरोप केला आहे.
या दूषित, गढूळ पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषद प्रशासनाने या नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत व पिण्यायोग्य करण्याची मागणी भाजपचे विक्की कोरेकार, ज्ञानेश्वर शिरभये, सूरज नरुले, चुन्नीलाल कुडवे यासह असंख्य नागरिकांनी केली आहे.
कोट
श्रीहरी बालाजी मंदिराच्या मागे असलेल्या प्रभागातील नळधारकांना पिण्यासाठी दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषद प्रशासनाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा.
- विकी कोरेकर,
भाजप पदाधिकारी तथा नागरिक, चिमूर